
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील पुणे लेनवर कोन गावाजवळ झालेल्या एका भीषण अपघातात प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असफिया बानो मोहम्मद फरीद खान (वय 22, रायबरेली, उत्तर प्रदेश) हिचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत तिच्या सोबत प्रवास करणारे चार सहकारी गंभीर जखमी झाले आहेत.
पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, टोयोटा अर्बन क्रुझर कार क्रमांक UP 32 MU 2287चा चालक नूर आलम खान (वय 34) याने निष्काळजीपणे व वेगाने वाहन चालवले. अचानक नियंत्रण सुटल्याने कारने 3 ते 4 वेळा पलटी घेतल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. अपघात एवढा जबर होता की कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
या अपघातात असफिया खान हिला गंभीर दुखापत झाली होती. तसेच तिचे सहकारीही जखमी झाले होते. घटनास्थळावरून सर्व जखमींना तात्काळ MGM रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच असफियाने प्राण सोडले. या घटनेत 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.
असफिया खान ही सोशल मीडियावरील लोकप्रिय चेहरा होती. इंस्टाग्रामवर तिचे अडीच लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. ती आपल्या लाइफ स्टाइल, प्रवास, फॅशन आणि ब्लॉग व्हिडिओंसाठी ओळखली जात असे. फक्त मनोरंजन क्षेत्रातच नव्हे, तर ती राजकारणातही सक्रिय होती. उत्तर प्रदेशच्या समाजवादी पार्टीला ती उघडपणे समर्थन देत होती.
लखनऊतील या तरुणीने अल्पावधीतच सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग निर्माण केला होता. तिच्या अचानक झालेल्या निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर असंख्य फॅन्सनी तिच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. या प्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी गुन्हा नोंदवून अधिक तपास सुरू केला आहे.
असफिया खान 15 दिवसांपूर्वी तिच्या मैत्रिणींसह मुंबईला फिरायला आली आहे. मुंबई फिरल्यानंतर ती रविवारी रात्री लोणावळ्याला निघाली होती. मात्र रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. या अपघाता वेळी कारमध्ये 4 जण होते. कार वेगाने जास असताना चालकाने नियंत्रण गमावले, ज्यामुळे कार सिमेंटच्या बॅरियरला धडकली आणि उलटली. मागे बसलेल्या असफिया खानच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तिचे चाहते हळहळ व्यक्त करत आहेत.