Onkar Bhojane : ओंकार भोजने खरंच अनप्रोफेशनल? दिग्दर्शकाच्या ‘त्या’ आरोपानंतर सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरनं सगळंच सांगितलं
Onkar Bhojane : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर वर्धन कामतनं ओंकार भोजनेसाठी केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा‘ फेम ओंकार भोजनेवर ‘अफरातफरी‘ या सिनेमाचे दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी गंभीर आरोप केले होते. ओंकार फोन उचलत नाही, सिनेमाच्या प्रमोशनला उपस्थित राहत नाही, तो अनप्रोफेशनल आहे, असं त्यांनी म्हटलेलं. या आरोपांवर ओंकारनं एका मुलाखतीत भाष्य केलेलं. ‘माझ्या कामाची थोडी पद्धत अशी आहे की, एखाद्या रिडिंगमध्ये किंवा शूटिंगमध्ये जर मी असेन, मी माझा फोन घेऊ शकत नसेन तर तो फ्लाइट मोडवर म्हणजे, बंदच असतो. त्यामुळे त्यादरम्यान येऊन गेलेले कॉल मला कळतात आणि मी कॉलबॅक करतोच, फक्त त्यावेळी मला ते शक्य नसतं, पण नंतर कॉलबॅक करतोच, त्यामुळे मी त्या ईपींच्या संपर्कात आजही व्यवस्थित आहे, फक्त त्यावेळी दिग्दर्शकांनी तसं का म्हटलं? हे मला नेमकं माहीत नाही.’ असं ओंकार म्हणाला. अशातच आता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर वर्धन कामतनं ओंकार भोजनेसाठी एक व्हिडिओ उपहासात्मक व्हिडिओ शेअर केला आहे.
वर्धन कामतची पोस्ट
वर्धन कामत म्हणतो की, ‘ओंकार भोजने अनप्रोफेशनल आणि पथेटिक आहे आणि हे विधान चुकीचं नाहीये. 2024 मध्ये मी माझ्या कुटुंबासोबत एका स्टुडिओमध्ये गेलेलो. तिथे ओंकारची रिहर्सल सुरू होती आणि आम्हाला बघताच क्षणी हा स्टेजवरून खाली उतरला, माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, मी पाहतो तुमचा कॉन्टेन्ट, मला खूप आवडतो. अरे! स्वतःची रिहर्सल सोडून नवख्या कलाकारांना अशी दाद कोणी देतं का? स्टुडिओमधून बाहेर पडताना, साडीच्या वेशात धावत येऊन मला म्हणाला, ‘आपण फोटो काढूया‘ आणि स्वतःचा नंबर देऊन गेला. कोण करतं का असं? पुढे, मी माझ्या ‘उमेश‘ या सिनेमासाठी त्याला विचारलं, तेव्हा ऑस्ट्रेलिया टूरच्या कमीटेन्टमुळे मला नकार दिला त्याने. आणि कहर म्हणजे, गेल्या महिन्यात त्याने स्वतःहून मला फोन करून सांगितलं, ‘मी गोव्यात येतोय तुझा सिनेमा बघायला‘ आम्ही ना विमानाचे पैसे दिले, ना त्याच्या राहण्याची व्यवस्था केली.’
‘माझ्या घरी येऊन माझ्या खोलीत थांबला. रात्री आम्ही जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो, तेव्हा त्या रेस्टोरंटवाल्यांनी आमच्याकडे प्रोफेशनल बाईट मागितली. तेव्हा ओंकार हात जोडून म्हणाला, ‘मी प्रमोशनल कॉन्टेन्ट नाही करत, कारण मी इन्स्टावर सक्रिय नाही‘ दुसऱ्यादिवशी निघण्याआधी माझ्या मुलांसोबत तो रील बनवतो आणि मला कॉन्टेन्ट लिहायला वेळ पण नाही देत. किती अनप्रोफेशनल. आणि कळस म्हणजे ‘मित्र म्हणे‘ या पॉडकास्टवर जाऊन हा लाखो लोकांसमोर माझं आणि माझ्या सिनेमाचं नाव घेतो. आजकाल इंडस्ट्रीत लोक कोणाचं नाव नाही घेत, तो एका गोव्यातील कलाकाराचं नाव घेतो किती अनप्रोफेशनल.’
‘व्यावहारिक दृष्टीने हे सगळं चुकीचं आहे. पण, सिनेमा जर अजूनही माणसांचा आणि संवेदनशीलतेचा प्रांत मानला जात असेल तर ओंकार अनप्रोफेशनल नाही, ओंकार या बाजारात दुर्लभ आहे. या बाजाराला कलाकार हवे असतात की हिशोबी विक्रेते, हे ज्याचं त्याने ठरवावं. ‘ असं वर्धननं शेवटी म्हणत ओंकारचं कौतुक केलं आहे.