
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या आंतरधर्मीय लग्नाबाबत तिचे दोन्ही भाऊ खुश नसल्याच्या चर्चा अनेकदा होत्या. यामागचं कारण म्हणजे बहीण सोनाक्षी आणि तिचा मुस्लीम बॉयफ्रेंड झहीर इक्बालच्या लग्नाला दोन्ही भावंडं उपस्थित नव्हती. त्यामुळे त्यांच्यातील कौटुंबिक वाद विशेष चर्चेत होता. सोनाक्षीवर तिची दोन्ही भावंडं नाराज असल्याचं म्हटलं गेलं. इतकंच नव्हे तर एका भावाने सोशल मीडियावर काही उपरोधिक पोस्टसुद्धा लिहिले होते. आता कुश सिन्हाने बहिणीसोबतच्या वादाच्या चर्चांवर अखेर मौन सोडलं आहे. कुश लवकरच दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. त्याच्या ‘निकिता रॉय’ या चित्रपटात त्याचीच बहीण सोनाक्षी मुख्य भूमिकेत आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत कुशला बहिणीसोबतच्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
कुश म्हणाला, “सेटवर ही गोष्ट खूप स्पष्ट होती की ती एक अभिनेत्री आहे आणि तीसुद्धा अशी अभिनेत्री जिने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलंय आणि तिला कामाचा बराच अनुभव आहे. ही गोष्ट मी लक्षात ठेवती आणि सेटवर मी तिला एखाद्या अभिनेत्रीसारखाच आदर दिला. मी प्रत्येकाशी असाच वागतो. मग ते माझे नातेवाईक असो वा नसो. आपल्याला माहीत असतं की कलाकारांकडे कामाची कमतरता नसते. त्यांच्याकडे दर आठवड्याला स्क्रीप्ट्स येत असतात. अशातच जर एखादी व्यक्ती तुमच्या प्रोजेक्टसाठी वेळ देत असेल तर तुम्ही त्यांच्याशी आदरपूर्वकच वागलं पाहिजे.”
दुसरीकडे सोनाक्षीचा दुसरा भाऊ लव सिन्हाने तिच्या लग्नानंतर एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहिली होती. त्यात त्याने लिहिलं होतं की, “काहीही झालं तरी काही लोकांशी कधीच संबंध ठेवायचा नव्हता, म्हणून मी लग्नाला गेलो नव्हतो.” या पोस्टमुळे सोनाक्षीच्या भावंडांमध्ये नाराजी असल्याचं स्पष्ट जाणवलं होतं. सोनाक्षी आणि झहीरने सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर 23 जून रोजी नोंदणी पद्धतीने लग्न केलं होतं. त्यानंतर त्यांनी भव्य रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. या लग्नात शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा तर दिसले. मात्र सोनाक्षीचे सख्खे भाऊ लव आणि कुश कुठेच दिसले नव्हते.