वयाच्या 17 व्या वर्षी लग्न, अंडरवर्ल्ड डॉनशी कनेक्शन; 30 वर्षांनंतर अभिनेत्रीचं बॉलिवूडमध्ये कमबॅक

तब्बल 30 वर्षांनंतर अभिनेत्री भारतात परतली; 17 व्या वर्षी सोडली होती फिल्म इंडस्ट्री

वयाच्या 17 व्या वर्षी लग्न, अंडरवर्ल्ड डॉनशी कनेक्शन; 30 वर्षांनंतर अभिनेत्रीचं बॉलिवूडमध्ये कमबॅक
Sonam
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 05, 2022 | 9:57 AM

मुंबई: नव्वदच्या दशकात ‘बिकिनी गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनम खान आता फिल्म इंडस्ट्रीत पुनरागमन करतेय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनमने बॉलिवूडमध्ये परत येण्याच्या प्लॅनविषयी सांगितलं. त्याचप्रमाणे अचानक फिल्म इंडस्ट्री का सोडली, याविषयीचा खुलासाही तिने केला.

अंडरवर्ल्डशी होतं कनेक्शन

‘त्रिदेव’ या चित्रपटातील ‘ओए.. ओए..नजर ने किया है इशारा’ या गाण्यातून सोनमने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यावेळी सोनमने माधुरी आणि संगीता यांसारख्या अभिनेत्रींनाही टक्कर दिली होती. मात्र सोनमने अचानक बॉलिवूडला रामराम करत सर्वांनाच मोठा आश्चर्याचा धक्का दिला. सोनमचं नाव अंडरवर्ल्ड डॉन अबु सालेमशीही जोडलं गेलं होतं. याच कारणामुळे तिने देश सोडलं होतं, असंही म्हटलं जातं.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनमने इंडस्ट्रीत कमबॅक करण्याची इच्छा बोलून दाखवली. चित्रपट तसंच ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पुनरागमन करण्यास ती सज्ज आहे. “मला तीन वर्षांपूर्वीच कमबॅक करायचं होतं, मात्र तेव्हा शक्य झालं नाही. त्यानंतर कोविड महामारी आली. त्यामुळे बऱ्याच गोष्टी रखडल्या”, असं तिने सांगितलं.

लग्नामुळे बॉलिवूड सोडल्याचं तिने या मुलाखतीत स्पष्ट केलं. सोनमने ‘त्रिदेव’ चित्रपटाचे दिग्दर्शक राजीव रायशी लग्न केलं होतं, ते सुद्धा कमी वयात. राजीववर जीवघेणा अपघात झाल्यानंतर सोनम भारत सोडून लॉस एंजिलिसला गेली. त्यानंतर हे दोघं स्वित्झर्लंडमध्ये स्थायिक झाले. मात्र या दोघांचा संसार फार काळ टिकू शकला नाही. सोनम आणि राजीवने घटस्फोट घेतला.

“1988 मध्ये जेव्हा मी यश चोप्रा यांच्या ‘विजय’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली, तेव्हा माझ्याकडे नव्या ऑफर्सची रांग लागली होती. मला जराही संघर्ष करावा लागला नव्हता. त्यानंतर त्रिदेव, मिट्टी और सोना या चित्रपटांमुळे मला रातोरात प्रसिद्धी मिळाली. मात्र त्यावेळी माझ्या डोक्यात काय चालू होतं काय माहीत. मला स्वत:चं कुटुंब हवं होतं. त्यावेळी मी फक्त 17 वर्षांची होते आणि अचानक एकेदिवशी लग्नाचा निर्णय घेतला”, असं सोनमने सांगितलं.

सोनम आता 50 वर्षांची आहे. फिल्म इंडस्ट्री सोडून तिला 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. सोनमला एक मुलगा आहे. त्याचं नाव गौरव असं आहे. सोनमने नुकतंच इन्स्टाग्रामवर अकाऊंट उघडलं आहे. इन्स्टाच्या बायोमध्ये तिने स्वत:विषयी लिहिलं, ‘मी 14 वर्षांची असताना फिल्म इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली आणि 17 व्या वर्षी इंडस्ट्री सोडली. 18 व्या वर्षी मी कुठेतरी हरवून गेले. तीन दशकांनंतर मी जणू स्वत:लाच पुन्हा सापडली आहे.’ सोनम ही रजा मुराद यांची भाची आहे. तिचं खरं नाव बख्तावर खान आहे.