‘आता वेळ आली आहे…’ सोनू सूदची सरकारकडे 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद करण्याची मागणी

अभिनेता सोनू सूदने १६ वर्षांखालील मुलांसाठी एक महत्त्वाची मागणी केली आहे. ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी घेतलेल्या या निर्णयाचे भारतातही अनुकरण करावे, असे त्याचे म्हणणे आहे. मुलांचे खरे बालपण जपावे, कौटुंबिक संबंध मजबूत असावेत या हेतूने त्याने सरकारला यावर आवश्यक पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.

आता वेळ आली आहे… सोनू सूदची सरकारकडे 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद करण्याची मागणी
Sonu Sood Demands Social Media Ban for Under 16s Australia Model for India
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 12, 2025 | 12:36 PM

बॉलीवूड अभिनेता सोनू सूद हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. चित्रपटसृष्टीतील त्याच्या कामाव्यतिरिक्त, त्याने त्याच्या सामाजिक कार्याद्वारे राष्ट्रीय स्तरावरही ओळख मिळवली आहे. दरम्यान,सोनू सूदने आता अजून एका मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसेच त्याबद्दल त्याने थेट सरकारकडे मागणी केली आहे. त्याने आता 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाबाबत आवश्यक पावले उचलण्याचे आवाहन सरकारला केले आहे.

भारतातील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याची मागणी

सोनू सूदने भारतातील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. अभिनेत्याने खऱ्या बालपणाची आणि मजबूत कौटुंबिक संबंधांची गरज यावर भर दिला आहे. अलिकडेच ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सोनू सूदने देखील यावर आपले मत व्यक्त केले आहे. ऑस्ट्रेलिया सरकारच्या याच निर्णायाचे उदाहरण देत भारत सरकारने देखील याचे अनुकरण करून 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाबाबत आवश्यक पावले उचलण्याचं, सोशल मीडिया बंद करण्याचे आवाहन सरकारला केलं आहे.


अभिनेता सोनू सूदला देशभरातील लोकांचे समर्थन

अभिनेता सोनू सूदने इंस्टाग्रामवर पोस्ट करत म्हटलं की, “ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घातली आहे. भारतानेही याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आपल्या मुलांना खरे बालपण, मजबूत कौटुंबिक संबंध आणि स्क्रीन व्यसनापासून मुक्तता मिळावी अशी आमची इच्छा आहे. आमच्या सरकारने देशाच्या भविष्यासाठी मोठी पावले उचलली आहेत आणि हे आणखी एक उत्तम उदाहरण मांडू शकते. उद्याच्या चांगल्या भारतासाठी आजच आपल्या मुलांचे रक्षण करूया.” अभिनेता सोनू सूदच्या या पोस्टनंतर देशभरातील लोक त्याच्या समर्थनार्थ बाहेर पडले आहेत आणि त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी करत आहेत.


“मुलांसाठी नाही” हा पर्याय निवडणे आवश्यक आहे”

आपल्या देशात 16 वर्षांखालील मुलांकडून सोशल मीडियाचा वापर नियंत्रित करण्यासाठी कोणतेही ठोस कायदे नाहीत. सोशल मीडियावरील व्यभिचाराच्या विरोधात एक कायदा लागू करण्यात आला आहे, ज्यामध्ये कोणताही व्हिडिओ अपलोड करण्यापूर्वी “मुलांसाठी नाही” हा पर्याय निवडणे आवश्यक आहे. ही सेटिंग काही व्हिडिओ मुलांपर्यंत पोहोचण्यापासून रोखते परंतु पूर्ण नियंत्रण प्रदान करत नाही. एकदा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला की, तो कोणत्याही वापरकर्त्याद्वारे ॲक्सेस केला जाऊ शकतो. शिवाय, या वर्षी सरकारने डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा लागू केला आहे, ज्यामध्ये 18 वर्षांखालील मुलांसाठी अकाउंटना परवानगी देण्यापूर्वी प्रमुख सोशल मीडिया कंपन्यांना पालकांची परवानगी घेणे आवश्यक आहे.