
अभिनेता सुनील शेट्टी गेल्या काही महिन्यांपासून सतत वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. आधी मुलगी अथिया शेट्टीच्या डिलिव्हरीवरून त्याने सी-सेक्शनचा पर्याय निवडणाऱ्या महिलांबाबत वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यानंतर वर्किंग वुमनवर प्रतिक्रिया देऊन तो चर्चेत आला होता. आता सोशल मीडियावर सुनील शेट्टीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये तो एका मिमिक्री आर्टिस्टवर भडकल्याचं पहायला मिळतंय.
हे प्रकरण मध्य प्रदेशच्या भोपाळमधील आहे. एका कार्यक्रमात स्थानिक मिमिक्री आर्टिस्टने स्टेजवर सुनील शेट्टीची नक्कल करण्याचा प्रयत्न केला. ते पाहून सुनील शेट्टी चांगलाच भडकतो. संयम आणि राग अनावर झाल्याने तो थेट स्टेजवर जाऊन मिमिक्री आर्टिस्टला सुनावतो आणि सर्वांसमोर त्याचा अपमान करतो. भोपाळच्या करोंद इथल्या एका कार्यक्रमात सुनील शेट्टीला आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी एक आर्टिस्ट त्याच्या ‘धडकन’ या चित्रपटातील डायलॉग म्हणत सुनील शेट्टीची नक्कल करून दाखवतो.
ही नक्कल पाहून सुनील शेट्टी थेट स्टेजवर जातो आणि त्याला सुनावतो, “कधीपासून आहे हा भाऊ, अंजली.. वेगवेगळे डायलॉग्स बोलतोय. माझा आवाज असा नाहीच आहे. इतकी घाणेरडी मिमिक्री मी आजवर पाहिली नाही. जेव्हा सुनील शेट्टी बोलतो, तेव्हा तो पुरुषासारखं बोलतो. हा लहान मुलासारखा डायलॉग म्हणतोय. मिमिक्री करतोय तर चांगली कर. वाईट नक्कल करू नये.”
सुनील शेट्टीचा राग पाहून तो मिमिक्री आर्टिस्ट समजावण्याचा प्रयत्न करतो की तो गंभीरप्रकारे नाही, तर हलक्या फुलक्या अंदाजात कॉपी करण्याचा प्रयत्न करतोय. तरीसुद्धा सुनील शेट्टी त्याचं काहीच ऐकून घेत नाही. उलट पुढे त्याला म्हणतो, “अजून खूप वेळ लागेल. तुला सुनील शेट्टी बनायला खूप वेळ लागेल. फक्त मागे केस बांधल्याने काही होत नाही. लहान बाळ आहे हा. सुनील शेट्टीचे अॅक्शन चित्रपट याने अजून पाहिले नाहीत, अन्यथा कधीतरी प्रयत्नही करू शकतो.”
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. सुनील शेट्टीने ज्युनियर मिमिक्री आर्टिस्टशी प्रेमाने बोलायला पाहिजे होतं, असं अनेकजण म्हणत आहे. इतका अहंकार आणि राग बरा नव्हे, असे कमेंट्स नेटकऱ्यांनी केले आहेत.