“गोविंदाला मूर्ख लोक आवडतात”, सुनीता अहूजाने नवऱ्याबाबत केला मोठा खुलासा

गोविंदाची पत्नी सुनीता अहूजाने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये खळबळजनक वक्तव्य केले आहे. तिने “गोविंदाला मूर्ख लोक आवडतात” असे म्हटले आहे.

“गोविंदाला मूर्ख लोक आवडतात”, सुनीता अहूजाने नवऱ्याबाबत केला मोठा खुलासा
Govinda and Sunita Ahuja
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Feb 20, 2025 | 1:03 PM

एकेकाळी बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणून गोविंदा ओळखला जातो. गोविंदाची पत्नी सुनिता अहूजा देखील नेहमी सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. सुनीता ही तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी विशेष ओळखली जाते. मग ते पती गोविंदाचे खासगी आयुष्य असू देत किंवा इंडस्ट्रीमधील इतर कलाकार. सुनिता ही नेहमीच अनेक गोष्टींवर भाष्य करताना दिसते.अलीकडेच सुनीताने गोविंदाबाबत केलेले वक्तव्य चर्चेत होते. ‘गोविंदाला मूर्ख लोक अधिक आवडतात. तो रात्री अडीच वाजेपर्यंत अशा लोकांबरोबर बसला आहे, जे त्याच्या प्रत्येक वाक्याला होकार देतात’ असे सुनीता म्हणाली.

सुनीताने नुकताच ‘कर्ली टेल्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने खासगी आयुष्यावर देखील वक्तव्य केले. सुनीताला या मुलाखतीमध्ये पती गोविंदाविषयी देखील काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर सुनीताने गोविंदा ज्यांच्याशी तासंतास बोलत असतो त्यांनाही त्याचे बोलणे आवडत नाही असे सांगितले. पुढे या मुलाखतीमध्ये ती म्हणाली, “मी सकाळी साडेतीन वाजता जाग आली म्हणून उठले. तेव्हा गोविंदा काम करत असल्याचे मी पाहिले. त्याच्या झोपेचे चक्र पूर्णपणे ढासळले आहे आणि आजपर्यंत त्याने ते सुधारलेले नाही. गोविंदा रात्री अडीच वाजता झोपतो. तो नेहमीच असा असतो कारण तो सतत अगदी २४ तास काम करत असतो. आता ही त्याची सवय झाली आहे.”

या मुलाखतीमध्ये सुनीताने सांगितले की तिचा आणि गोविंदाचा स्वभाव वेगवेगळा आहे. “मला कमी बोलायला आवडते. कारण मला मूर्ख लोकांवर माझी ऊर्जा वाया घालवायला अजिबात आवडत नाही. आणि गोविंदाला मूर्ख लोक प्रचंड आवडतात. म्हणून चार मूर्ख लोकांबरोबर तो बसतो आणि गप्पा मारतो. मला हे अजिबात आवडत नाही” असे सुनीता म्हणाली.

सुनीताला तिचा वेळ हा पूजा आणि प्रार्थना करण्यात घालवण्यात आवडतो. तसेच तिने गेल्या १२ वर्षांपासून एकटीनेच वाढदिवस साजरा केला आहे. तसेच तिचा बराचसा वेळ हा मुलांवर घालवला आहे. आता मुले मोठी झाली असल्यामुळे तिला स्वत:साठी जगायचे आहे अशी इच्छा तिने व्यक्त केली आहे.