
अभिनेत्री करिश्मा कपूरच्या मुलांनी दिवंगत वडील संजय कपूर यांच्या मालमत्तेत वाटा मिळावा अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. गेल्या काही महिन्यांपासून दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. आता न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. संजय कपूरच्या मालमत्तेच्या वादात करिश्माच्या मुलांनी खळबळजनक आरोप केले आहेत. करिश्माच्या मुलांनी दावा केला की त्यांचे वडील संजय कपूर यांचं मृत्यूपत्र बनावट आहे, ते जिवंत असतानाच त्यात छेडछाड करण्यात आली होती आणि बदल करण्यात आले होते. गेल्या सुनावणीत वकील महेश जेठमलानी यांनी युक्तीवाद केला की, संजय त्यांच्या मुलांसोबत सुट्टीवर असताना मृत्यूपत्र बदलण्यात आलं होतं. मृत्यूपत्रात सुधारणा करणाऱ्या व्यक्तीला संजय कपूरच्या मृत्यूच्या एक दिवसानंतर लगेच कंपनीचा संचालक बनवण्यात आलं.
संजयची पत्नी प्रिया सचदेव कपूरने बनावट मृत्यूपत्र बनवून वडिलांची संपत्ती हडपण्याचा आरोप करिश्माच्या मुलांनी त्यांच्या याचिकेत केला आहे. याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात खटला सुरू आहे. करिश्माच्या मुलांच्या मते, संजय कपूर यांनी त्यांना मालमत्तेत वाटा देण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु मृत्यूपत्रात त्यांची नावंच नमूद केलेली नाहीत. त्यामुळे प्रिया कपूरने मृत्यूपत्रात छेडछाड केल्याचा आरोप मुलांनी याचिकेत केला आहे. मुलांच्या वकिलांनी मृत्यूपत्राची फॉरेन्सिक तपासणी करण्याचीही मागणी केली. याला प्रिया कपूरच्या वकिलांनी विरोध केला आहे. तर दिल्ली उच्च न्यायालयाने प्रिया कपूर आणि मृत्यूपत्राची अंमलबजावणी करणाऱ्याला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
बिझनेसमन संजय कपूरने तीन लग्नं केली होती. फॅशन डिझायनर नंदिता महतानीशी त्याने पहिलं लग्न केलं होतं. तर दुसरं लग्न हे अभिनेत्री करिश्मा कपूरशी झालं होतं. या दोघांना समायरा ही मुलगी आणि कियान हा मुलगा आहे. 2014 मध्ये करिश्मा आणि संजय यांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. यावेळी करिश्माने संजय आणि त्याच्या कुटुंबीयांवर बरेच गंभीर आरोप केले होते. 2026 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर संजयने प्रिया सचदेवशी तिसरं लग्न केलं. या दोघांना अझारियस हा मुलगा आहे. संजयने प्रिया सचदेवचा पहिला पती विक्रम चटवालपासून मुलगी सफिरा चटवाल हिलाही दत्तक घेतलं होतं. आता संजयच्या मृत्यूनंतर त्याच्या मालमत्तेवरून मोठा वाद सुरू आहे.