वाढदिवशीच तीन फॅन्सचा मृत्यू, प्रसिद्ध अभिनेता हादरला.. असं काय घडलं ? चाहत्यांना केली विनंती

Yash : सुपरस्टार यशचा वाढदिवस चाहत्यांसाठी खास... मात्र त्याच दिवशी तिघा चाहत्यांचा वेदनादायक मृत्यू.. धक्कादायक कारणामुळे तिघांनी गमावला जीव.. चाहत्यांच्या मृत्यूची बातमी कळताच सुपरस्टारने घेतली कुटुंबियांची भेट.. चाहत्यांना केली खास विनंती

वाढदिवशीच तीन फॅन्सचा मृत्यू, प्रसिद्ध अभिनेता हादरला.. असं काय घडलं ? चाहत्यांना केली विनंती
| Updated on: Jan 10, 2024 | 8:40 AM

Yash : साऊथचा सुपरहिट चित्रपट ‘केजीएफ‘ मुळे नवी ओळख मिळवणारा अभिनेता यश सध्या सगळ्यांच्या गळ्यातला ताईत आहे. साऊथसोबतच हिंदीतही त्याचे लाखो चाहते असून ते त्याच्यावर वेड्यासारखं प्रेम करतात. 8 जानेवारीला यशचा वाढदिवस असतो, त्याचा वाढदिवस चाहत्यांसाठीही खूप खास, तो एखाद्या सणासारखा साजरा केला जातो.
यंदा यशने त्याचा 38वा वाढदिवस सेलिब्रेट केला. मात्र हा वाढदिवस त्याच्यासाठी एक दु:खद बातमी घेऊन आला. यशच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याच्या तीन चाहत्यांचं निधन झालं. आणइ एकच खळबळ माजली.

यशच्या चाहत्यांना त्यांच्या आवडत्या स्टारच्या वाढदिवसाची खूप उत्सुकता होती. मात्र, उत्साहाच्या भरात त्याच्या तीन चाहत्यांनी असे पाऊल उचलले की त्यांना जीव गमवावा लागला. या अपघाताने यशला खूप धक्का बसला आहे. मात्र स्वत:च दु:ख सावरत तो लगेचच त्या (मृत) चाहत्यांच्या कुटुंबियांना भेटायला गेला. तसेच मीडियाच्या मदतीने चाहत्यांना मोठं आवाहनही केलं.

चाहत्यांच्या कुटुंबियांची घेतली भेट

यशच्या वाढदिवशानिमित्त कर्नाटकातील सुरंगी येथे त्याचे तीन चाहते त्याच्या वाढदिवसाचे बॅनर लावत होते. यादरम्यान त्यांना विजेचा जोरदार धक्का बसून त्यांचा मृत्यू झाला. तर आणखी तीन चाहते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी लक्ष्मेश्वर रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही बातमी ऐकताच यश खूप अस्वस्थ झाला आणि त्याने कर्नाटकचा रस्ता धरला. बातमी ऐकताच यशने मृत आणि जखमी चाहत्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यशने या दुर्दैवी घटनेबाबत शोक व्यक्त केला. तसेच (कुटुंबियांना) त्यांना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले.

चाहत्यांना केली विनंती

चाहत्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर यशने माध्यमांशी संवादही साधला. त्याद्वारे त्याने आपल्या चाहत्यांना खास विनंतीही केली. तो म्हणाला- ‘ तुम्ही जर माझ्यावर मनपासून प्रेम करत असाल तर जिथे असाल तिथून मला शुभेच्छा द्या. अशा दु:खद घटनांनी मला माझ्या वाढदिवसाची भीती वाटते. असे फॅन्डम दाखवू नका. कृपया असे प्रेम दाखवू नका. मला तुम्हा सर्वांना विनंती करायची आहे. बॅनर लटकवू नका, बाईकवर स्वार होऊन, पाठलाग करू नका, आणि धोकादायक सेल्फी काढू नका. माझे प्रेक्षक आणि चाहत्यांनी माझ्यासारखे आयुष्यात पुढे जावे अशी माझी इच्छा आहे.’ अशा शब्दांत यशने चाहत्यांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले.

 

यंदा वाढदिवसाचं सेलिब्रेशन नाही

यशने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती की कमिटमेंट्समुळे तो यावर्षी त्याच्या वाढदिवशी चाहत्यांना भेटू शकणार नाही. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी यामागचे खरे कारण सांगितले. यश म्हणाला, ‘ मी यावर्षी माझा वाढदिवस साजरा करत नाही कारण कोविडची प्रकरणे वाढत आहेत. माझ्या बाजूने कोणालाही त्रास होऊ नये. म्हणून मी ते साधेपणाने आणि माझ्या कुटुंबासोबत साजरे करायचे ठरवले आहे, ‘असेही त्याने स्पष्ट केले.