स्वरा भास्करच्या सासऱ्यांना ब्रेन हॅमरेज, अभिनेत्रीकडून प्रार्थनेची विनंती

स्वरा भास्करच्या सासऱ्यांना ब्रेन हॅमरेज झाला असून रविवारी सकाळी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. स्वरा भास्करने याविषयी सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे.

स्वरा भास्करच्या सासऱ्यांना ब्रेन हॅमरेज, अभिनेत्रीकडून प्रार्थनेची विनंती
स्वरा भास्कर, फहाद अहमद आणि तिचे सासरे
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 01, 2025 | 7:25 PM

अभिनेत्री स्वरा भास्करचे सासरे आणि राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष फहाद अहमद यांच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झालं आहे. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. खुद्द स्वराने याबद्दलची माहिती सोशल मीडियावर दिली. सासऱ्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याची विनंती तिने चाहत्यांना केली आहे. स्वरा भास्करच्या सासऱ्यांना शनिवारी 29 नोव्हेंबर रोजी ब्रेन हॅमरेज झाला होता. त्यानंतर रविवारी सकाळी त्यांच्यावर सर्जरी करण्यात आली. तेव्हापासून स्वरा आणि तिचे कुटुंबीय रुग्णालयातच आहेत. स्वराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित सासऱ्यांच्या प्रकृतीविषयीची माहिती दिली आहे. ‘फहादचे वडील आणि माझ्या सासऱ्यांना शनिवारी 29 नोव्हेंबर रोजी ब्रेन हॅमरेज झाला होता आणि रविवारी सकाळी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या स्थितीत आम्ही कुटुंबीयांना सांभाळण्यात व्यस्त आहोत. त्यामुळे काही दिवसांकरिता सोशल मीडियावर सक्रिय नसू. कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा’, अशी विनंती तिने या पोस्टद्वारे केली आहे.

स्वराच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर दुसरीकडे फहादने अद्याप त्याच्या वडिलांविषयी कोणती माहिती दिली नाही. स्वरा भास्करने 2023 मध्ये फहादशी लग्न केलं होतं. लग्नाआधी दोन ते तीन वर्षे दोघांमध्ये चांगली मैत्री होती. त्यानंतर 6 जानेवारी 2023 रोजी दोघांनी विशेष विवाह कायद्यांतर्गत नोंदणी पद्धतीने लग्न केलं. 2019 मध्ये एका आंदोलनादरम्यान स्वरा आणि फहादची पहिल्यांदा भेट झाली होती. स्वरा हिंदू आणि फहाद मुस्लीम असल्याने या लग्नावरून नेटकऱ्यांकडून बरीच टीका झाली होती. स्वराने ज्या वर्षी फहादशी लग्न केलं, त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात स्वराने मुलीला जन्म दिला. या दोघांच्या मुलीचं नाव राबिया आहे.

स्वरा आणि फहाद नुकतेच ‘पती पत्नी और पंगा’ या रिअॅलिटी शोमध्ये एकत्र झळकले होते. हा शो कपल्सवर आधारित होता. या शोचा पहिला सिझन रुबिना दिलैक आणि अभिवन शुक्लाने जिंकला होता. स्वराच्या करिअरबद्दल बोलायचं झाल्यास, 2022 मध्ये ती ‘जहां चार यार’ आणि ‘मीमांसा’ या चित्रपटांमध्ये झळकली होती. 2021 मध्ये तिने ‘आपके कमरे में कोई रहता है’ या शोमध्ये काम केलं होतं. सध्या ती ‘मिसेस फलानी’ या चित्रपटासाठी शूटिंग करत होती. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही.