
अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येते. यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्वरा म्हणाली, “माझ्यासाठी ट्विटर हे प्लॅटफॉर्म अत्यंत महागडं पडलंय. कारण त्याचा मोठा परिणाम माझ्या करिअरवर झाला.” विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर स्वरा तिची स्पष्ट मतं मांडत आली आहे. मात्र आपले मोकळे विचार मांडणाऱ्या स्वराला चित्रपटाची ऑफर दिली तर काहीतरी वाद होईलच, या भीतीने निर्मात्यांनी तिला ऑफर्स देणंच बंद केल्याचं तिने म्हटलंय. “माझ्या जवळच्या व्यक्तींना वाटतं की मीच माझ्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलं आणि माझं करिअर उद्ध्वस्त करून घेतलं”, असंही ती म्हणाली.
‘कनेक्ट सिने’ला दिलेल्या मुलाखतीत स्वरा याविषयी पुढे म्हणाली, “या जगात जर अशी एखादी गोष्ट असेल ती मला सर्वांत महागात पडली असेल, ती म्हणजे माझं ट्विटर अकाऊंट. कारण त्यामुळेच माझ्या करिअरवर मोठा परिणाम झाला. बऱ्याच निर्मात्यांसाठी मी इंडस्ट्रीत अस्पृश्य आहे आणि हे माझे शब्द नाहीत. हे माझ्या शुभ-चिंतकांचे, निर्मात्यांचे आणि दिग्दर्शकांचे शब्द आहेत, ज्यांनी मला कॉल करून असं सांगितलं. लोक मला म्हणतात की त्यांना मला भूमिकेची ऑफर द्यायची आहे पण स्टुडिओकडून माझं नाव ऐकल्यानंतर नकार देण्यात येतं.”
“माझ्यामुळे काहीतरी वाद निर्माण होईल अशी निर्मात्यांना भीती आहे. ही कसली भीती मला माहीत नाही पण ही भीती त्यांच्यात आहे. मला रस्त्यावर, एअरपोर्टवर अनेक लोकं भेटतात आणि माझ्यामुळे त्यांना धैर्य मिळत असल्याचं सांगतात. हे ऐकून मला खूप बरं वाटतं. पण माझ्याच शुभचिंतकांना असं वाटतं की मी माझ्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलंय. असे बरेच लोक माझ्या आयुष्यात आहेत, जे मला म्हणतात की मी चुकीचं केलं. मी माझं करिअर उद्ध्वस्त केलं. ते मला विचारतात की मी असं का केलं? माझा भाऊ नेहमीच माझ्या पाठिशी उभा असतो. पण तोसुद्धा या कारणामुळे माझ्यावर चिडतो आणि म्हणतो की, तुझ्यासारख्या उत्तम अभिनेत्रीने स्वत: पायावर कुऱ्हाड मारून घेतलं”, अशा शब्दांत स्वराने नाराजी बोलून दाखवली.