Swati Deval : मिसकॅरेज झालेलं, काळी-निळी पडले अन्…मराठी अभिनेत्रीनं सांगितला हृदयद्रावक प्रसंग
Marathi Actress : मराठी अभिनेत्री स्वाती देवलनं एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल सांगितलं आहे.

मराठी अभिनेत्री स्वाती देवलनं अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्री ‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘लक्ष्मी निवास’ यांसारख्या मालिकांमध्ये दिसली आहे. अभिनेत्रीनं तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूप त्रास सहन केला आहे. स्वातीचं मिसकॅरेज झालेलं. त्याबद्दल तिनं एका मुलाखतीत सांगितलं आहे.
स्वाती देवलनं सांगितला प्रसंग
स्वाती देवल म्हणाली की, ‘स्वराध्य होण्याच्या आधी माझं दोनदा मिसकॅरेज झालेलं, एकदा तर सातव्या महिन्यात माझं मिसकॅरेज झालेलं आणि त्यावेळी तो मुलगाच होता. त्यावेळी मी फारच कठीण परिस्थितीतून वर आलेले. तेव्हा मी स्वामींचा जप करतच हॉस्पिटलमध्ये गेले होते आणि स्वामींचा जप करतच बाहेर आले. तेव्हासुद्धा स्वामींनी वाचवलं, मी त्यावेळी काळी-निळी पडले होते. डॉक्टरांनी तुषारला सांगितलेलं की, माहिती नाही हिचं काय होईल, तुम्ही सह्या द्या. त्यानं थरथरत सह्या केल्या होत्या. तेव्हासुद्धा त्यानंही महाराजांचं स्मरण केलेलं. सहाव्या महिन्यात समजतं की, बाळाचे सगळे अवयव चांगले आहेत.’
‘स्वराध्यच्या वेळेला ते ऐकेपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता. तेव्हा मी स्वामींचं कॉइन आणि दत्तगुरुंचं कॉइन आहे चांदीचं, ते मी हातात पकडून सोनोग्राफीला गेले होते. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं, बाळ चांगलं आहे. त्यावेळी तिथून बाहेर आल्यानंतर मी जप करत होते, बाळ चांगलं असुदे बाकी सगळं नंतर बघू. कारण आधीचे अनुभव वाईट होते.’
स्वामी भक्तीबद्दल बोलताना स्वाती म्हणालेली की, ‘महाराज हे प्रत्येकवेळेला बरोबर असतात, याची मला अनुभूती आली. मी बऱ्याचदा वाडीला जाते. तिथे दिगंबर पुजारींचं मोठं घर आहे. तिथेच गुरुप्रसाद पुजारीही आहेत, त्यांचेच पुत्र. त्यांना मी गुरु मानते. आम्ही नेहमी त्यांच्याकडे जातो. एकदा त्यांनी मला सांगितलेलं, तुमच्या दादर येथील मठात दर शनिवारी जा, काहीही मागू नकोस, काहीही बोलू नको, फक्त नमस्कार कर. तोरण ठेव. लक्ष ठेवा असंही म्हणू नकोस कारण, स्वामींचं लक्ष आहे. 11 वेळा असं कर.’
‘माझे शेवटचे 2 शनिवार बाकी होते, माझी तब्येत बिघडली. त्यावेळी मला नवरा म्हणाला, घरात बस! महाराजांचं नामस्मरण कर. अचानक एक व्यक्ती दुपारी पादुका आणि रिसीट घेऊन आला. तर मी त्यांना म्हटलं मी नाही पैसे भरले, तर तो म्हणाला तुमच्याचसाठी आहेत, पाठवल्या आहेत. मी त्या घेतल्या. एक दिवस 1500ची पावती मी त्या माणसाच्या नावानं स्वामींच्या चरणी ठेवली.’ असं स्वातीनं शेवटी सांगितलं. ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री बोलत होती.