9 वर्षांनंतर ‘तारक मेहता..’मध्ये परतणार दयाबेन? जेठालालने सोडलं मौन, ‘पोपटलाल’ला अश्रू अनावर

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारलेली अभिनेत्री दिशा वकानी कमबॅक कधी करणार, हा प्रश्न सतत विचारला जातो. आता अभिनेते दिलीप जोशी यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहेत. ते काय म्हणाले, जाणून घ्या..

9 वर्षांनंतर तारक मेहता..मध्ये परतणार दयाबेन? जेठालालने सोडलं मौन, पोपटलालला अश्रू अनावर
दिशा वकानी, श्याम पाठक
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 30, 2026 | 8:05 AM

टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय आणि दीर्घकाळापासून सुरू असलेल्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेला नुकतीच 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त सेटवर खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मालिकेतील सर्व कलाकार उपस्थित होते. माध्यमांशी संवाद साधताना अभिनेते दिलीप जोशी यांनी दयाबेनच्या कमबॅकविषयी प्रतिक्रिया दिली. तर ‘पोपटलाल’ला अश्रू अनावर झाले. इतकी वर्षे या मालिकेत काम करण्याचा अनुभव कसा होता, याविषयी सांगताना कलाकार भावूक झाले होते. अभिनेत्री दिशा वकानी या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारत होती. 2017 मध्ये बाळंतपणासाठी तिने काही काळ ब्रेक घेतला होता. त्यानंतर ती मालिकेत परतलीच नाही. आता नऊ वर्षांनंतरही चाहते दयाबेनच्या प्रतिक्षेत आहेत.

काय म्हणाले दिलीप जोशी?

‘तारक मेहता..’च्या सक्सेस पार्टीमध्ये दयाबेनच्या कमबॅकविषयी दिलीप जोशी म्हणाले, “जवळपास दहा वर्षांपासून दिशा या मालिकेशी जोडलेली होती. लोकांना ही गोष्ट माहितच आहे की आम्ही दोघांनी मिळून खूप चांगलं काम केलं आहे. आमची भन्नाट केमिस्ट्री आणि घरातील सीन्स लोकांना खूप आठवतात. नुकतंच असित भाई मला सांगत होते की आमचे घरातले सीन्स त्यांनासुद्धा खूप आठवतात. त्यांच्या डोक्यात अजूनही तशा प्रकारचे सीन्स आहेत, परंतु ते स्क्रिप्टमध्ये आणू शकत नाहीत. दिशाने ज्या पातळीवर काम केलंय, त्याची आठवण तर मलासुद्धा येते. त्यामुळे आता मी एवढीच आशा करतो की, काहीतरी चमत्कार होऊ दे आणि ती या मालिकेत परत येऊ दे.”

‘पोपटलाल’ भावूक

दुसरीकडे ‘तारक मेहता..’ या मालिकेला अठरा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पोपटलालची भूमिका साकारणारे अभिनेते श्याम पाठक भावूक झाले होते. त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. श्याम पाठक यांचं कौतुक करत निर्माते असितकुमार मोदी म्हणाले, “त्यांनी औषधं घेऊन या मालिकेचे शूट्स पूर्ण केले आहेत. माझ्या मनात त्यांच्याविषयी प्रचंड आदर आहे.” ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचा पहिला एपिसोड 28 जुलै 2008 रोजी टीव्हीवर प्रसारित झाला होता. यातील सर्व कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. लहानांपासून मोठ्यापर्यंत या मालिकेचा चाहतावर्ग आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us