एका मराठी मुलीला दुखावलं तुम्ही..; ‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांवर अभिनेत्रीचा संताप, नेटकरीही भडकले
'तारक मेहता..' या लोकप्रिय मालिकेच्या निर्मात्यांवर एका मराठमोळ्या अभिनेत्रीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या मालिकेत सुनीताची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता शिसोडे हिने सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट लिहिली आहे. नुकतीच तिने ही मालिका सोडली आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यामध्ये भाजीवाली सुनीताची भूमिका साकारणारी मराठीमोळी अभिनेत्री प्राजक्त शिसोडे हिने सोशल मीडियावर संतप्त पोस्ट लिहित मालिका सोडल्याचं जाहीर केलं. जिथे माझा अनादर केला जातो आणि मला अन्याय्य वागणूक दिली जाते, तिथे मी काम करू शकत नाही, असं तिने लिहिलं होतं. त्यानंतर प्राजक्तावर ही पोस्ट डिलिट करण्यासाठी मालिकेच्या टीमकडून दबाव टाकला जात आहे. आणखी एक पोस्ट लिहित प्राजक्ताने याबद्दलचा खुलासा केला. मराठी कलाकार फक्त नोकर आणि भाजीवाली या भूमिकांसाठी नाहीत, असं स्पष्ट मत तिने मांडलं आहे.
पोस्ट डिलिट करण्यासाठी टीमकडून दबाव
‘सोशल मीडियावरून पोस्ट डिलिट करण्यासाठी ‘तारक मेहता..’च्या टीमकडून माझ्यावर सतत दबाव टाकला जात आहे. इतकंच नाही तर ते सतत माझं सोशल मीडिया अकाऊंट तपासत आहेत की मी पोस्ट डिलिट केली की नाही? मी इतर मराठी अभिनेत्रींना विनंती करते की त्यांनी ‘तारक मेहता..’मध्ये सुनीताची भूमिका करू नका. कारण ती भूमिका मालिकेसाठी महत्त्वाची नाही, असा विचार ते करतात. (हा माझा अनुभव आहे.) आपण नोकर किंवा भाजीवालीची भूमिका साकारण्यासाठी जन्माला आलो नाही’, अशा शब्दांत प्राजक्ताने नाराजी व्यक्त केली. मनापासून काम करत होती मी, एका मराठी मुलीला दुखावलं तुम्ही. असो.. देव तुमचं भलं करो, असं तिने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय.
View this post on Instagram
“मराठी कलाकार फक्त नोकर आणि भाजीवाली या भूमिकांसाठी नाहीत. त्यांना भूमिका महत्त्वाची वाटत नाही आणि आता त्याच भूमिकेसाठी ते मराठी थिएटर आर्टिस्ट शोधत आहेत. जर मालिकेसाठी भूमिका इतकी महत्त्वाची नाही तर मग थिएटर आर्टिस्ट कशाला पाहिजे? तर पुन्हा आपल्या मराठी कलाकारांची किंमत कमी करायला का”, असा संतप्त सवाल तिने केला. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. मालिका सोडण्याचा तुझा निर्णय योग्यच होता, असं एकाने म्हटलंय. तर ‘ताई तुम्ही बरोबर बोलला आहात’, असं म्हणत नेटकऱ्यांनी तिला पाठिंबा दर्शविला आहे.
