23 व्या वर्षापासूनच केसगळती, पूर्णपणे खचलो..; ‘तारक मेहता..’मधल्या भिडे मास्तरांचा संघर्ष
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत अभिनेते मंदार चांदवडकर हे आत्माराम भिडेची भूमिका साकारत आहेत. वयाच्या 23 व्या वर्षीच त्यांना केसगळतीची समस्या निर्माण झाली होती. यामुळे ते खूप खचले होते.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेला तब्बल 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेनं आपल्या दमदार अभिनयकौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. काही कलाकार मालिकेत सुरुवातीपासून काम करत आहेत, तर काही जण मधल्या काळात या लोकप्रिय मालिकेशी जोडले गेले. यामध्ये आत्माराम भिडेची भूमिका साकारणारे मंदार चांदवडकर यांनी त्याच्या निवडीचा किस्सा सांगितला. यावेळी ते त्यांच्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळाविषयीही मोकळेपणे व्यक्त झाले.
‘तारक मेहता..’ला 18 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी माध्यमांशी बोलताना मंदार म्हणाले, “वयाच्या 23 व्या वर्षापासून माझे केस गळू लागले होते. तेव्हा मी दुबईत मेकॅनिकल इंजीनिअरची नोकरी करत होतो. अचानक होत असलेल्या केस गळतीमुळे मी खूप चिंतेत होतो. आता अभिनयक्षेत्रात करिअर कसं करणार, याचीच मला चिंता असायची. हळूहळू माझा आत्मविश्वास कमी होऊ लागला. टक्कल पडत असल्यामुळे माझ्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती.”
याविषयी त्यांनी पुढे सांगितलं, “मी खरंतर मेकॅनिकल इंजीनिअर होतो. 1997 ते 2000 पर्यंत मी दुबईतच होतो. तिथे जाण्यापूर्वी मी मराठी मालिकेत काम केलं होतं. माझं करिअर सेट झालंय, असं मला वाटत होतं. परंतु काही जबाबदाऱ्यांमुळे मला दुबईत नोकरीसाठी जावं लागलं होतं. तिथे गेल्यानंतर पाच महिन्यांतच केसगळतीची समस्या निर्माण झाली. तेव्हा मी फक्त 23 वर्षांचा होतो. तुम्ही कल्पना करा की, तरुण वयात अशी समस्या उद्भवली तर मानसिक स्थिती कशी असेल? त्यातही मी अभिनेता बनण्याचं स्वप्न पाहत होतो. मी प्रचंड नर्व्हस झालो होतो. तेव्हा माझ्या रुममेटने मला सांगितलं की, कदाचित तुझा हाच लूक तुझ्यासाठी एसेट बनेल आणि खरंच तसं झालं. असित कुमार मोदी यांना माझा लूक खूप आवडला होता.”
मंदार यांनी यावेळी ‘तारक मेहता..’च्या ऑडिशनचाही उल्लेख केला. गोकुळधाम सोसायटीचा सेक्रेटरी बनण्यासाठी निर्मात्यांनी त्यांना जो डायलॉग दिला होता, तो आजही त्यांना आठवणीत आहे. ‘तारक मेहता..’ या मालिकेला 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. 28 जुलै 2008 रोजी या मालिकेचा पहिला एपिसोड प्रसारित झाला होता.