Taarak Mehta | ‘मुनमुन रात्री बाहेर जाईल, तू एकटीच काय करशील? ये आपण सोबत..’; अभिनेत्रीकडून निर्मात्यांवर आरोप

जेनिफरने तिच्या तक्रारीत निर्मात्यांवर बरेच आरोप केले आहेत. सिंगापूरच्या घटनेनंतर मालिकेतील तिचा स्क्रीन टाईम कमी करण्यात आला, असं ती म्हणाली. "मी कधीच शूटिंगदरम्यान मोठी सुट्टी घेतली नाही. मला माझ्या कुटुंबीयांसोबत स्वित्झर्लंडला जायचं होतं."

Taarak Mehta | मुनमुन रात्री बाहेर जाईल, तू एकटीच काय करशील? ये आपण सोबत..; अभिनेत्रीकडून निर्मात्यांवर आरोप
Jennifer Mistry Bansiwal
Image Credit source: Instagram
| Updated on: May 11, 2023 | 2:18 PM

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत मिसेस रोशन सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसिवालने निर्माते असितकुमार मोदी यांच्यावर धक्कादायक आरोप केला आहे. जेनिफरने असितकुमार मोदी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. इतकंच नव्हे तर तिने मुंबईतील पवई पोलीस ठाण्यात असित मोदी आणि त्यांच्या प्रॉडक्शन टीममधील इतर दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. टीव्ही 9 भारतवर्षला दिलेल्या मुलाखतीत जेनिफर म्हणाली, “माझा 14 वर्षांचा वनवास अखेर संपला आहे आणि मी फार खुश आहे. खरंतर हे लोक खूप पॉवरफुल आहेत. ते लोकांना घाबरवून ठेवू शकतात. त्यांच्यासमोर तोंड कसं उघडायचं हे विचार करूनसुद्धा भिती वाटते. मात्र हळूहळू संयमाचा बांध तुटला. इतकं घाबरलंय की आता भितीच निघून गेली आहे.”

जेनिफरने सांगितलं की असित मोदींनी केलेल्या काही कमेंट्समुळे तिला अनकम्फर्टेबल वाटलं होतं. सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. मात्र 2019 मध्ये जेव्हा ‘तारक मेहता..’ची टीम शूटिंगसाठी सिंगापूरला गेली होती, तेव्हा असित मोदींनी तिच्या ओठांबाबत कमेंट केली होती. “जेनिफर तुझे ओठ मला खूप आवडतात, असं वाटतं किस करावं”, हे ऐकून तिला आश्चर्याचा धक्काच बसला होता. त्याच ट्रिपमध्ये असित मोदींनी असंही तिला म्हटलं की, “मुनमुन तर रात्री बाहेर जाईल, तू एकटी काय करशील? ये आपण सोबत व्हिस्की पिऊयात.” हे ऐकल्यानंतर जेनिफर खूप घाबरली होती.

जेनिफरने तिच्या तक्रारीत निर्मात्यांवर बरेच आरोप केले आहेत. सिंगापूरच्या घटनेनंतर मालिकेतील तिचा स्क्रीन टाईम कमी करण्यात आला, असं ती म्हणाली. “मी कधीच शूटिंगदरम्यान मोठी सुट्टी घेतली नाही. मला माझ्या कुटुंबीयांसोबत स्वित्झर्लंडला जायचं होतं. त्यासाठी मी प्रॉडक्शन हाऊसकडे 15 दिवसांची सुट्टी मागितली होती. मात्र त्यांनी मला नकार दिला. जेव्हा मी रडत असितजींना कॉल केला तेव्हा ते म्हणाले, रडू नकोस. जर तू माझ्याजवळ असतीस तर मी तुला मिठी मारली असती. मात्र नंतर त्यांनी मस्करी करतोय असं म्हणत त्या गोष्टीला टाळलं”, असंही तिने सांगितलं.

लैंगिक शोषणाची तक्रार केल्यानंतर जेनिफरविरोधात निर्मात्यांनी पैसे उकळण्यासाठी नोटीस बजावल्याचा आरोप केला. अखेर 8 एप्रिल रोजी जेनिफरने असित मोदी, सोहैल रमाणी आणि जतिन बजाज यांना नोटीस बजावली.