बंद करा हा शो.. ‘तारक मेहता..’चा नवीन प्रोमो पाहिल्यानंतर भडकले नेटकरी

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. मात्र गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत झालेल्या काही बदलांमुळे त्याची लोकप्रियता कमी होत असल्याचं पहायला मिळतंय. आतापर्यंत यातील बऱ्याच कलाकारांनी मालिकेचा निरोप घेतला आहे.

बंद करा हा शो.. तारक मेहता..चा नवीन प्रोमो पाहिल्यानंतर भडकले नेटकरी
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 04, 2023 | 12:47 PM

मुंबई : 4 डिसेंबर 2023 | टेलिव्हिजनवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेला आजवर प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. मात्र गेल्या काही काळापासून या मालिकेबाबत वाद सुरू आहे. यातील बऱ्याच कलाकारांनी मालिकेचा निरोप घेतला. तर काहींनी निर्मात्यांवर गंभीर आरोप केले. दुसरीकडे गेल्या काही वर्षांपासून मालिकेतून दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी गायब आहे. दिशा पुन्हा मालिकेत कधी येणार, असा प्रश्न चाहत्यांकडून वारंवार विचारला गेला. निर्मात्यांनी नुकताच चाहत्यांना दिलासा देत दयाबेनची वापसी होणार असल्याची गुडन्यूज दिली होती. मात्र त्यावरूनच आता नेटकरी निर्मात्यांवर भडकले आहेत आणि ते मालिकेवर बंदी आणण्याची मागणी करत आहेत.

दयाबेनची वापसी होणार म्हणून चाहते खूप उत्सुक होते. मात्र मालिकेत तसं काही घडलंच नाही. खरंतर मालिकेतील बऱ्याच एपिसोड्समध्ये दयाबेनच्या वापसीबद्दलची कथा दाखवली जात होती. काही एपिसोड्समध्ये तर दयाबेनच्या स्वागताचीही तयारी दाखवण्यात आली होती. मात्र आता मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये दाखवलं की दयाबेन येणार नाही. दयाबेन नाही येणार हे समजताच गोकुलधाम सोसायटीमधील सर्वजणांचा राग अनावर होतो, असं यामध्ये दाखवलं गेलंय. मात्र केवळ सोसायटीचे लोकच नाहीत तर निर्मात्यांच्या या खेळीवर आता प्रेक्षकसुद्धा चिडले आहेत. इतकंच नव्हे तर अनेकांनी मालिकेवर बंदीची मागणी केली आहे.

‘असित कुमा मोदी.. तुम्ही तुमच्या प्रेक्षकांचं मन मोडून खूप खुश असाल. आता नवीन एपिसोड्स पाहण्यामागचं काही कारण नाही. तुम्हाला काय करायचं होतं, ते आम्हाला समजलंय. तुम्हाला खरंच लाज वाटली पाहिजे’, असं एकाने लिहिलं. तर ‘चाहत्यांना दुखावून तुम्ही आनंदी आहात का? पुरे झालं आता. बंद करा ही मालिका,’ असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारलेली अभिनेत्री दिशा वकानी घराघरात लोकप्रिय आहे. दिशाने बाळंतपणासाठी मालिकेतून ब्रेक घेतला होता. मात्र ती पुन्हा सेटवर परतलीच नाही. गेल्या सहा वर्षांपासून मालिकेचे निर्माते तिला परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रेक्षकसुद्धा तिला परत आणण्याची जोरदार मागणी करत आहेत.

नवरात्रीच्या दिवसांत दिशा वकानीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये ती तिच्या पती आणि मुलासोबत दिसून आली होती. नवरात्रीमध्ये दिशा पारंपरिक गुजराती वेशभूषेत पहायला मिळाली होती. नवरात्रीच्याच एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी ती पती आणि मुलासोबत आली होती. मात्र तिला तिच्या कुटुंबीयांसोबत रमलेली पाहून मालिकेत पुन्हा येणार असल्याचा काही विचार नाही, असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला होता.