
‘बिग बॉस 19’ हा सिझन अगदी पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे. या सिझनमध्ये इन्फ्लुएन्सर आणि बिझनेसवुमन तान्या मित्तल सर्वांचं लक्ष वेधून घेतेय. तान्याचं राहणीमान, तिचं बोलणं, तिचा स्वभाव.. या सर्वांनी नेटकऱ्यांमध्ये खूप चर्चा होतेय. तान्या बिग बॉसच्या घरात सतत तिचा मोठेपणा सांगताना दिसते. माझ्या आजूबाजूला नेहमी बॉडीगार्ड्स असतात, आमच्या घरातील प्रत्येक सदस्याचे बॉडीगार्ड्स आहेत, मला घरात आणि बाहेरसुद्धा सर्वजण ‘बॉस’ म्हणून हाक मारतात, माझ्या बॉडीगार्ड्सने कुंभमेळादरम्यान 100 लोकांचे प्राण वाचवले.. असं ती घरातील इतर सदस्यांना सांगत आली आहे. इतकंच नव्हे तर माझं घर इतकं आलिशान आहे की त्यासमोर 7 स्टार हॉटेल्ससुद्धा फिके आहेत, असं तिने म्हटलंय. अशातच तान्याच्या घराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर अत्यंत प्रशस्त आणि आलिशान घराचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तान्या खोटं बोलत नव्हती, हे तिचं घर आहे… असं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय. परंतु या आलिशान घरामागचं वेगळंच सत्य समोर आलं आहे. या व्हिडीओच्या कमेंटमध्ये काहींनी त्याची पोलखोल केली आहे. हे तान्याचं घर नाही तर पाकिस्तानमधील सर्वांत महागडा राजवाडा आहे, असं नेटकऱ्यांनी सांगितलं आहे. ‘द रॉयल पॅलेस’ असं त्याचं नाव आहे. इस्लामाबादमधील गुलबर्ग याठिकाणी हा राजवाडा आहे. यामध्ये थिएटर, जिम, स्विमिंग पूल, बगीचा अशा सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. या राजवाड्याची किंमत सुमारे 1.25 अब्ज म्हणजेच जवळपास 125 कोटी रुपये आहे.
Babu Tanya wasn’t lying …
Tanya’s super luxurious house in gwalior 😭🔥#TanyaMittal • #BiggBoss19 pic.twitter.com/210BmAiIwD— 𝑺𝒏𝒐𝒘𝒚-♡ (@shedreams___) September 6, 2025
‘बिग बॉस 19’मध्ये तान्या मित्तलने नीलमशी बोलताना तिच्या घराविषयी खुलासा केला होता. माझं घर खूप सुंदर आहे आणि ते पृथ्वीवरील स्वर्गासारखं दिसतं, असं ती म्हणाली होती. इतकंच नव्हे तर तिच्या घरासमोर 5 स्टार किंवा 7 स्टार हॉटेल्ससुद्धा फिके दिसतील, अशा शब्दांत तिने वर्णन केलं होतं. घराबद्दल तान्याने केलेल्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर राजवाडाचा व्हिडीओ व्हायरल झाला. परंतु काही वेळातच त्याची पोलखोल झाली. तान्याच्या दाव्यांवर विश्वास तरी कसा ठेवायचा, असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.