तौबा, तौबा… मराठी गाण्याचा…, अभिनेता सचिन यांनी अमराठी गायकाला छेडलं, त्यानंतर घडला इतिहास…

| Updated on: Feb 14, 2024 | 10:23 PM

अमराठी गायकाला मराठीतील दोन अक्षरांची मोठी भीती वाटत होती. त्यासाठीच ते मराठी गाणी गाण्यास नकार देत होते. पण, मराठीतला सुपरस्टार अभिनेता सचिन पिळगावकर यांनी त्यांना छेडले. एक दोन म्हणता म्हणता त्या गायकाने मराठीतील तीन गाणी म्हटली.

तौबा, तौबा... मराठी गाण्याचा..., अभिनेता सचिन यांनी अमराठी गायकाला छेडलं, त्यानंतर घडला इतिहास...
Sachin Pilgaonkar
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

मुंबई | 13 फेब्रुवारी 2024 : मराठी चित्रपटांसाठी अनेक अमराठी गायकांनी गाणी म्हटली आहेत. ही सर्व गाणी सुपरडुपर हिट झालीत. यामध्ये प्रामुख्याने मोहम्मद रफी, तलत मेहमूद, हेमंत कुमार, गंगुबाई हनगल, बेगम परवीन सुलताना, भूपिंदर सिंग, मुकेश, श्रेया घोशाल यांची नावे घेता येतील. याच शृंखलेतील एका अमराठी गायकाला मराठीतील दोन अक्षरांची मोठी भीती वाटत होती. त्यासाठीच ते मराठी गाणी गाण्यास नकार देत होते. पण, मराठीतला सुपरस्टार अभिनेता सचिन पिळगावकर यांनी त्यांना छेडले. एक दोन म्हणता म्हणता त्या गायकाने मराठीतील तीन गाणी म्हटली आणि त्या तिन्ही गाण्याने मराठी गाण्यांचा इतिहास रचला.

अभिनेता सचिन पिळगावकर यांच्या चित्रपटासाठी मराठी गाणी गाणारे ते अमराठी गायक होते किशोर कुमार. अभिनेता, गायक म्हणून किशोर कुमार हे त्यावेळी खूपच लोकप्रिय होते. त्यांच्या आवाजात एक वेगळी नजाकत होती. एकापेक्षा एक सरस चित्रपट त्यांनी केलेच शिवाय त्यांनी म्हटलेल्या गाण्यांना त्या काळात तोडच नव्हती.

मोहम्मद रफी, हेमंत कुमार, भूपिंदर सिंग, मुकेश, एस पी बाल सुब्र्ह्मण्यम, महेंद्र कपूर, मन्नाडे आदि गायकांच्या स्पर्धेत किशोर कुमार यांनी आपला स्वत:चा वेगळं ठसा उमटवला होता. पण, किशोर कुमार यांना मराठीत गाणी गाण्यासाठी कुणी विचारलं नव्हतं. अभिनेता सचिन पिळगावकर हा हिंदी आणि मराठी सिनेमात काम करता होता.

१९८६ साली ‘गंमत जंमत’ या सिनेमाची तयारी सुरु होती. सचिन पिळगावकर, अशोक सराफ, अशोक सराफ, वर्षा उसगावकर, चारूशीला साबळे, सतीश शाह, सुधीर जोशी, श्रीकांत मोघे, आशालता आणि विजू खोटे अशी बडी स्टारकास्ट होती. यात अशोक सराफ आणि चारूशीला साबळे यांच्यावर चित्रित होणाऱ्या एका गाण्यासाठी सचिन यांना एक वेगळा प्रयोग करायचा होता.

सचिन यांनी या गाण्यासाठी आर. डी. बर्मन यांच्याशी संपर्क केला. पण, त्यांनी टाळले. त्यानंतर सचिन हे किशोर कुमार यांच्याकडे गेले. त्यांनीही नकार दिला. त्यावर सचिन यांनी किशोर कुमार यांना थेट ‘दादा, तुम्हाला मराठी गाणी फालतू वाटतात का?’ असा प्रश्न केला. त्यावर त्यांचे उत्तर होते, ‘अरे ना बाबा ना.. तौबा तौबा.. मी तर मराठी गाण्याचा मोठा चाहता आहे. मी मराठी गाणी गाऊ शकतो. पण एक अडचण आहे. मला ‘ळ’ आणि ‘च’ ही दोन अक्षरे नीट गाऊ शकत नाही.

त्यावर सचिन यांनी पर्याय काढला. ही दोन अक्षरे कमी असतील असे गाने तुम्हाला देईन असे ते म्हणाले. सचिन यांनी गीतकार शांताराम नांदगावकर यांच्याकडून ती दोन अक्षरे कमी असलेले गाणे लिहून घेतले. हेच ते किशोर कुमार यांनी गायलेले आणि अजरामर झालेले ‘अश्विनी ये sss ना’ हे गाणे. किशोर कुमार यांना या गाण्यात अनुराधा पौडवाल यांनी साथ दिली होती. पुढे, किशोर कुमार यांनी सचिन यांच्याच ‘भुताचा भाऊ’मध्ये ‘अग हेsssमा माझ्या प्रेमा’, ‘हा गोरा गोरा मुखडा’ ही गाणी म्हटली. ही तिन्ही गाण्यांनी एक नवा इतिहास रचला.