
अभिनेता जॉन अब्राहमचा ‘वेधा’ हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला होता, तेव्हा पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने त्याला विचारलं होतं की, तू एकाच प्रकारचे चित्रपट का करतोस? त्यावेळी जॉन त्याच्यावर नाराज झाला होता. परंतु नंतर त्याने माफीसुद्धा मागितली होती. परंतु त्याचं नेमकं उत्तर जॉनने त्याच्या कामातूनच दिलंय. जॉनचा ‘तेहरान’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातून पुन्हा एकदा जॉन त्याच्या ‘सिग्नेचर’ अंदाजाच दिसला आहे. गेल्या काही वर्षांत जॉनने एकाच पठडीतले चित्रपट केले आहेत आणि प्रेक्षकांनाही तो त्याच भूमिकांमध्ये आवडू लागला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ‘तेहरान’च्या माध्यमातून त्याने आपली वेगळी छाप सोडली आहे.
2012 मध्ये इस्रायली राजदूतांवर हल्ला होतो. या हल्ल्यात फुलं विकणारी एक लहान मुलगी मारली जाते. हे हल्ले इराण आणि इस्रायलमधील शत्रुत्वामुळे होतात. पण ते भारतात होतात. त्यानंतर याचा तपास एसीपी राजीव कुमार यांच्याकडे सोपवण्यात येतो. सुरुवातीला यात पाकिस्तानचा हात असल्याचा संशय असतो, पण नंतर हळूहळू गुपितं उघड होतात. नंतर राजकारण, मुत्सद्दीपणा आणि इतर बऱ्याच गोष्टी घडतात. या हल्ल्यांचा तपास करणारे आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी इराणमधील तेहरानला पोहोचणारे राजीव कुमार म्हणजेच आरके एकडे पडतात. पुढे काय घडतं, ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पहावा लागेल.
हा चित्रपट समजून घेण्यासाठी तुम्हाला इराण आणि इस्रायलबद्दल थोडं वाचावं लागेल. या दोन्ही देशांचे भारताशी कसे संबंध आहेत, याविषयी थोडीफार माहिती असणं आवश्यक आहे. दोन तासांचा हा चित्रपट प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी ठरवतो. नेहमीप्रमाणे यात जॉनने दमदार कामगिरी केली आहे. परंतु काही ठिकाणी यात पटकथा कमकुवत वाटू लागते. सर्वसामान्य प्रेक्षकांना समजण्यासाठी काही गोष्टी सोप्या पद्धतीने सांगायला हव्या होत्या, अशी गरज भासते.
काही ठिकाणी संवाद फारसी भाषेत असल्याने सबटायटल्स निरखून पहावे लागतात. हे थोडंसं त्रासदायक ठरू शकतं. पण हा चित्रपट अर्थहीन ॲक्शनपट नाही. जेव्हा जेव्हा त्यात ॲक्शन सीन्स दाखवले गेले आहेत, तेव्हा त्यामागे काहीतरी उद्देश नक्कीच आहे. जॉनचा हा चित्रपट थिएटरमध्ये नाही तर ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ओटीटीसाठी हा एक चांगला चित्रपट आहे. झी5 या प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटात जॉनने अपेक्षेपेक्षा खूप छान काम केलंय. हे पात्र त्याला खूप शोभतं. यामध्ये जॉन फक्त ॲक्शन करत नाही, तर तो प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणाऱ्या इतरही अनेक गोष्टी करतो. याशिवाय अभिनेत्री नीरू बाजवानेही चांगलं काम केलंय. हे एक वेगळ्या प्रकारचं पात्र आहे आणि ते तिला चांगलं शोभतंय. अभिनेत्री मानुषी छिल्लरनेही अॅक्शनचे सीन्स चांगले केले आहेत. जॉनच्या पत्नीच्या भूमिकेत मधुरिमा तुली विशेष प्रभाव पाडते. त्याचसोबत दिनकर शर्मा आणि हादी खंजनपूर यांनीही प्रशंसनीय काम केलंय.
या चित्रपटाचं लेखन रितेश शाह, आशिष वर्मा आणि बिंदानी कारिया यांनी केलंय. तर अरुण गोपालन हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटाचं लेखन आणखी थोडं चांगलं केलं जाऊ शकलं असतं. गोष्टी सोप्या पद्धतीने सांगता आल्या असत्या. पण तरीही एकंदरीत, हा एक चांगला चित्रपट आहे.
3 स्टार.