“बॉलिवूड पहिल्यासारखा धर्मनिरपेक्ष राहिला नाही”; जॉन अब्राहम ‘छावा’बद्दल पुढे म्हणाला..
अभिनेता जॉन अब्राहम नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'छावा' या चित्रपटाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. या चित्रपटाच्या यशानंतर त्याने विकी कौशल आणि निर्माते दिनेश विजन यांना मेसेज केला. त्याचप्रमाणे त्याने बॉलिवूडमधील प्रचारकी चित्रपटांबद्दलही मत मांडलं.

अभिनेता जॉन अब्राहम गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी ‘द डिप्लोमॅट’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या प्रमोशननिमित्त नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो प्रचारकी चित्रपटांबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. “हिंदी सिनेमा आता पहिल्याइतका सेक्युलर (धर्मनिरपेक्ष) राहिला नाही”, असं तो म्हणाला. यावेळी त्याने विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा उल्लेख केला. हा चित्रपट प्रचारकी असल्याची टीका अनेकांनी केली होती. मात्र तरीही बॉक्स ऑफिसवर तो हिट ठरला होता. “द काश्मीर फाइल्स हा अत्यंत प्रभावी चित्रपट होता. पण या चित्रपटाकडे मी प्रचाराचा भाग म्हणून बघू इच्छित नाही”, असं जॉन म्हणाला. यावेळी त्याने विकी कौशलच्या बहुचर्चित ‘छावा’ या चित्रपटावरही प्रतिक्रिया दिली.
‘द हॉलिवूड रिपोर्टर इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत जॉनला विचारलं गेलं की, “सिनेमा हे अजूनही एकत्रीकरण करणारं माध्यम आहे का?” त्यावर उत्तर देताना जॉन म्हणाला, “मला वाटत नाही की आपण आधीसारखे धर्मनिरपेक्ष राहिले आहोत, अगदी वैयक्तिक म्हणूनही. धर्मनिरपेक्ष राहणं खूप महत्त्वाचं आहे. आपण एका घट्ट दोरीवर चालतोय असं मला वाटतं. आपण प्रचारकी चित्रपट बनवतोय का? मला माहीत नाही.”
प्रचारकी चित्रपटांबद्दल बोलताना पुढे जॉनने 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा उल्लेख केला. “मला असं म्हणायचं आहे की आपण प्रभावशाली चित्रपट बनवतोय. एखाद-दुसरे म्हणतील की ‘द काश्मीर फाइल्स’सारखा एखादा चित्रपट प्रचारकी आहे.. एक सामान्य ग्राहक म्हणून तुम्हाला माहीत आहे की तो प्रभावित करणारा चित्रपट होता. त्याची कथा तुम्हाला प्रभावित करते. तो प्रचारकी चित्रपट होता की नाही, याबद्दलच मत बनवण्यासाठी मी इथे नाहीये. मी फक्त एक ग्राहक आहे, तो चित्रपट बघतो. तो चित्रपट मला भावतोय का, मला प्रभावित करतोय का? तर होय, करतोय. त्यासाठी इथे मी दिग्दर्शकांना श्रेय देईन. हे इतकं सोपं गणित आहे”, असं तो पुढे म्हणाला.
या मुलाखतीत जॉनने विकी कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटाबद्दलही प्रतिक्रिया दिली. “कदाचित मी त्या काही मोजक्या लोकांपैकी एक आहे, ज्याला प्रत्येकाचा यश साजरा करायला आवडतं. कोणताही चित्रपट हिट ठरला तरी त्याचा आनंद मी साजरा करतो. आपल्याकडे श्रद्धांजली वाहण्याची आणि लोकांबद्दल नकारात्मक लिहिण्याची प्रवृत्ती आहे. वो पिट गई, ये पिट गई.. (हा फ्लॉप झाला, तो फ्लॉप झाला) असं इंडस्ट्रीत खूप बोललं जातं. यात त्यांचा दु:खद आनंद असतो”, असा टोला त्याने इंडस्ट्रीतील कलाकारांना लगावला.
‘छावा’च्या यशानंतर विकी आणि निर्माते दिनेश विजन यांना मेसेज केल्याचं जॉनने पुढे सांगितलं. “सध्या बॉक्स ऑफिसवर छावाने कमाल कामगिरी केली आहे आणि मी त्याबद्दल विकीला मेसेजसुद्धा केला होता. मी त्याच्यासाठी खूप खुश आहे. मी निर्माते दिनेश विजन यांनासुद्धा मेसेज केला होता. त्यांच्या चित्रपटाच्या यशाबद्दल मी खूप खुश आहे, कारण ते लोकांना थिएटरपर्यंत खेचून आणत आहेत. त्यामुळे इंडस्ट्रीतील जे लोक बदल आणण्याचा प्रयत्न करत आहेत, चांगले चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांचं आपण अभिनंदन, कौतुक करायला हवं. मीसुद्धा अशी कामगिरी करू शकेन, अशी मला आशा आहे”, अशा शब्दांत जॉन व्यक्त झाला.
