
टेलिव्हिजनवरील सर्वाधिक चर्चेत आणि वादग्रस्त शो पैकी एक अशी ओळख असलेला बिग बॉसच्या 19 व्या पर्वाचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. यंदाच्या बिग बॉसच्या 19 व्या पर्वाचे विजेतेपद प्रसिद्ध अभिनेता गौरव खन्ना याने पटकावलं आहे. टॉप 5 मध्ये गौरवसोबत फरहाना भट्ट, प्रणित मोरे, अमाल मलिक आणि तान्या मित्तल पोहोचले होते. मात्र शेवटच्या दहा मिनिटांत गौरवला सर्वाधिक मतं मिळाली आणि तो या पर्वाचा विजेता ठरला. गौरवला बक्षिस म्हणून बिग बॉस 19 ची ट्रॉफी आणि 50 लाख रुपयांचा चेक देण्यात आला. गौरवच्या या विजयानंतर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.
बिग बॉसच्या घरात आपल्या दमदार व्यक्तिमत्वामुळे आणि स्पष्ट बोलण्यामुळे प्रेक्षकांची मने जिंकणारी फरहाना भट्टने टॉप-2 मध्ये तिचे स्थान निश्चित केले होते. तिला बिग बॉसची ट्रॉफी जिंकता आली नसली तरी तिला चाहत्यांकडून प्रचंड प्रेम मिळाले. आता नुकतंच टीव्ही ९ हिंदीच्या डिजीटल टीमने फरहानासोबत खास गप्पा मारल्या. यावेळी तिने तिच्या बिग बॉसच्या प्रवासावर, घरातल्या इतर स्पर्धकांबद्दल आणि आता ती पुढे काय करणार आहे, याबद्दल भाष्य केले.
यावेळी तिला तुला ट्रॉफीच्या इतक्या जवळ पोहोचूनही ट्रॉफी जिंकता आली नाही आणि गौरव विनर झाला तेव्हा वाईट वाटलं का? असा प्रश्न फरहानाला विचारण्यात आला. त्यावर तिने हो मला थोडीशी आशा होती की ट्रॉफी आपल्याला मिळेल, पण खरं सांगायचं तर मला अजिबात वाईट वाटलं नाही. कारण मी हरु देखील शकते, असेही माझ्या मनात आले होते. पण माझ्याकडे आता लोकांचं भरभरून प्रेम आणि पाठिंबा आहे. मी शोमध्ये ट्रॉफीपेक्षाही जास्त काहीतरी कमावलं आहे. लोक या सीझनला फरहाना भट्टचा सीझन म्हणत आहेत. माझ्या आईनेही मला हेच सांगितलं. माझ्यासाठी हेच खूप आहे, असे फरहाना भट्ट म्हणाली.
यानंतर तिने गौरव खन्नाच्या विजेतेपदावर भाष्य केले. माझ्या मते गौरव खन्नाचं या शोमध्ये कोणतंही योगदान नाही. प्रेक्षक हा शो कोणत्या दृष्टिकोनातून बघत आहेत, हे मला माहीत नाही, पण माझ्या मते त्याचे यात काहीही योगदान नाही. त्याने प्रत्येकवेळी खूप सेफ गेम खेळला. त्याने कधीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. त्याने आपल्या वागणुकीने लोकांना कमी लेखलं. त्याने अशा बऱ्याच गोष्टी केल्या आहेत, ज्या मी संपूर्ण शोमध्ये वेळोवेळी उघड केल्या. त्यामुळे मला वाटत नाही की तो विजेता होण्याच्या योग्यतेचा नाही आणि कधीही नव्हता, असं मला आजही वाटतं, असेही फरहानाने म्हटले.