
कपिल शर्माच्या सोनी टीव्हीवरील ‘द कपिल शर्मा शो’ विनोदी कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. मात्र आता कपिल शर्मा नेटफ्लिक्ससोबत ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ करतो आहे. त्यामुळे आता सोनीने नवा शो लॉन्च केला आहे. ‘आपका अपना जाकिर’ असं या कार्यक्रमाचं नाव आहे. प्रसिद्ध कॉमेडियन जाकिर खान हा कार्यक्रम होस्ट करणार आहे. जाकिरच्या कॉमेडीचे लाखो दिवाने आहेत. असं असतानाच त्याच्या येणाऱ्या नव्या कार्यक्रमाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या कार्यक्रमाचे प्रोमो समोर आले आहेत. यातून कार्यक्रमाची पहिली झलक पाहायला मिळाली आहे.
‘आपका अपना जाकिर’ या कार्यक्रमाचे प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. याला प्रेक्षकांनी, नेटकऱ्यांनी पसंत दिली आहे. हा कार्यक्रम जबरदस्त असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. तर या कार्यक्रमाची तुलना प्रेक्षक कपिल शर्माच्या शोसोबत करत आहेत. आता कपिल शर्माचं दुकान बंद होणार आहे, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.
‘आपका अपना जाकिर’ या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात ‘स्त्री’ सिनेमाची टीम आली होती. यावेळी त्यांच्याशी जाकिर खान याने केलेला संवाद लोकप्रिय ठरला आहे. यात मी घरच्यांसोबत राहिलं पाहिजे की वेगळं घर घेतलं पाहिजे? त्यावर जाकीर तिला म्हणतो जे लोक घरच्यांच्यासोबत, आई वडिलांसोबत राहतात त्यांचं मला फार कौतुक वाटतं. जोवर घरचे घरातून हाकलून देत नाहीत. तोवर त्याच घरात राहिलं पाहिजे, असं जाकिर तिला म्हणतो. हा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
जाकिर खान हा कॉमेडियन असण्यासोबतच शायर आहे. तो चांगल्या कविता, शायरी लिहितो. तसंच एखादा किस्सा तो चांगल्या प्रकारे रंगवून सांगतो. त्यामुळे कॉमेडीसोबतच जाकिरच्या या कार्यक्रमात शायरी देखील ऐकायला मिळणार आहेत. या कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या प्रोमोनेच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. जाकिर म्हणतो हा माझा नवा कार्यक्रम नाहीये. हा माझा पहिला कार्यक्रम आहे. पहिला आणि नवा कार्यक्रम यात फरक आहे. नव्या म्हणजे दरवेळी तुम्हाला काही नवं दिसतं. पण पहिलं म्हणजे जे तुम्ही पहिल्यांदा करता आणि ते तुमच्या लक्षात राहातं… त्याचा हा प्रोमो सध्या चर्चेत आहे.