
Thamma Review : आयुषमान खुराना आणि रश्मिका मंदाना यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘थमा’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर 21 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु त्यापूर्वी या हॉरर कॉमेडी चित्रपटाचा रिव्ह्यू समोर आला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने हा चित्रपट कसा आहे, त्याविषयी आपलं मत व्यक्त केलं आहे. हा चित्रपट ‘परफेक्ट दिवाळी एंटरटेनर’ असेल असं त्याने म्हटलंय. ‘थमा’ हा चित्रपट ‘मॅडॉक हॉरर कॉमेडी युनिव्हर्स’मधला एक चित्रपट आहे. याच बॅनरअंतर्गत आधी ‘स्त्री’, ‘भेडिया’, ‘मुंज्या’ आणि ‘स्त्री 2’ यांसारख्ये सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाले होते.
तरण आदर्शने त्याच्या रिव्ह्यूच्या सुरुवातीलाच मॅडॉक फिल्म्सचं खूप कौतुक केलं. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी विनोद, सुपरनॅच्युरल आणि रोमान्स यांचा परफेक्ट समतोल साधला आहे. जसजशी या चित्रपटाची कथा पुढे सरकते, तसतसे त्यात खुर्चीला खिळवून ठेवणारे ट्विस्ट पहायला मिळतात. ‘थमा’चं दिग्दर्शन आदित्य सरपोतदारने केलं असून तो प्रेक्षकांना निराश करणार नाही, असं तरण आदर्शने म्हटलंय. या चित्रपटाची कथा भारतीय लोककथांवर आधारित आहे. त्यामुळे त्याची कथा अत्यंत अनोखी आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी वाटते. या चित्रपटात सस्पेन्सचाही भरणा असून पुढे काय घडेल, याची उत्सुकता शेवटपर्यंत टिकून राहते.
‘थमा’चा प्लॉट रंजक आहेच, परंतु त्याच्या लिहिण्याच्या पद्धतीमुळे त्याला ते आणखी दमदार बनवतं. शिवाय या चित्रपटात अनेक ट्विस्ट आणि कॉमिक पंचलाइन्ससुद्धा प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावतील. मध्यांतरानंतर चित्रपटाचा वेग थोडा मंदावतो, परंतु त्याचा कथेवर कोणताच परिणाम होत नाही. या चित्रपटातील सर्व कलाकारांनी उत्तम भूमिका साकारल्याचं तरण आदर्शने म्हटलंय. ‘थमा’चा मुख्य अभिनेता आयुषमान खुरानाने उत्तम अभिनय केला आहे. फन आणि फिअर यांचा उत्कृष्ट समतोल आयुषमानने या चित्रपटात साधला आहे. आयुषमानमुळेच अनेक सर्वसामान्य सीन्ससुद्धा खास बनतात. तर रश्मिका मंदानासाठी या चित्रपटातील भूमिका अत्यंत आव्हानात्मक होती. कारण ती यामध्ये वॅम्पायरच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत आहे. तरीसुद्धा तिने त्यात आपली विशेष छाप सोडली आहे. आयुषमानच्या वडिलांच्या भूमिकेत परेश रावल असून नवाजुद्दी सिद्दिकी त्याच्या आगळ्यावेगळ्या भूमिकेमुळे चर्चेत येतो. या चित्रपटाच्या क्लायमॅक्समधील एक कॅमिओ जबरदस्त ठरणार आहे. हा हायव्होल्टेज ड्रामा चित्रपटाला आणखी मनोरंजक बनवतो.
‘थमा’मधील ‘पॉयजन बेबी’, ‘तुम मेरे ना हुए’ आणि ‘दिलबर की आंखो का’ ही गाणी रिलीज झाल्यापासून चर्चेत आहेत. याशिवाय हॉरर कॉमेडी चित्रपटासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट ठरते, ते म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक. या चित्रपटाच्या बॅकग्राऊंड म्युझिकमुळे त्याला आणखी भीतीदायक आणि तितकाच रंजक बनवतो. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शनच्या मते, जर तुम्हाला दिवाळीच्या सुट्टीत थिएटरमध्ये अत्यंत मनोरंजक चित्रपट पहायचा असेल, तर ‘थमा’ हा उत्तम पर्याय आहे.