The Ba***ds of Bollywood X Review: आर्यन खानच्या सीरिजमध्ये समीर वानखेडेंचा ट्विस्ट; चक्रावले नेटकरी

The Ba***ds of Bollywood X Review: आर्यन खान दिग्दर्शित 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' ही वेब सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. या सीरिजबद्दल सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. यामधील समीर वानखेडेंच्या ट्विस्टची जोरदार चर्चा होतेय.

The Ba***ds of Bollywood X Review: आर्यन खानच्या सीरिजमध्ये समीर वानखेडेंचा ट्विस्ट; चक्रावले नेटकरी
Sameer Wankhede and Aryan Khan
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 18, 2025 | 3:39 PM

The Ba***ds of Bollywood X Review: शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा पहिलावहिला प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ ही त्याची वेब सीरिज आजपासून (गुरुवार) नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होत आहे. 18 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता ही सीरिज प्रदर्शित झाली. यामध्ये लक्ष्य लालवानी, बॉबी देओल, राघव जुयाल आणि इतर अनेक कलाकारांच्या भूमिका आहेत. आर्यनने या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. ज्या प्रेक्षकांनी ही सीरिज पाहिली आहे, त्यांनी सोशल मीडियावर त्याचा रिव्ह्यू देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये अनेकांनी आर्यन खानचं कौतुक केलं आहे.

विशेष म्हणजे या वेब सीरिजच्या पहिल्याच एपिसोडमध्ये ड्रग्ज आणि स्टारकिड्सचा मुद्दा दाखवण्यात आला आहे. परंतु जसजशी त्याची कथा पुढे सरकत जाते, तसतसे त्यातील ट्विस्ट अक्षरश: चक्रावून सोडतात. आर्यन खानच्या दिग्दर्शनापासून ते कथा आणि त्याती ट्विस्टपर्यंत.. सर्वकाही प्रेक्षकांना आवडतंय. या सीरिजमध्ये समीर वानखेडेंसारखी एक भूमिका आहे. ही भूमिका साकारणारा अभिनेतासुद्धा हुबेहूब वानखेडेंसारखाच दिसतोय. समीर वानखेडे यांनी कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्जप्रकरण आर्यन खानला अटक केली होती. या प्रकरणात आर्यनला जवळपास महिनाभर तुरुंगात राहावं लागलं होतं. त्यानंतर त्याला क्लीन चिट मिळाली.

ऑक्टोबर 2021 मध्ये समीर वानखेडे यांनी त्यांच्या टीमसोबत कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. या छाप्यात एनसीबीने क्रूझमधून 13 ग्रॅम कोकेन, पाच ग्रॅम मेफेड्रॉन, 21 ग्रॅम गांजा, MDMAच्या 22 गोळ्या आणि रोख 1.33 लाख रुपये जप्त केले होते. एनसीबीने 14 जणांना रोखलं होतं आणि काही तासांच्या चौकशीनंतर 3 ऑक्टोबर रोजी दुपारी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुम धामेचा यांना अटक केली होती.

आर्यन खान आणि इतर आरोपींच्या व्हॉट्सअॅप चॅट्सचा आधार घेत वानखेडे यांच्या टीमने त्यांच्यावर ड्रग्ज तस्करीच्या मोठ्या कटाचा भाग असल्याचा दावा केला होता. आर्यन काही परदेशी ड्रग्ज सप्लायरच्या संपर्कात होता आणि त्याच्या चॅटमध्ये ‘हार्ड ड्रग्ज’ आणि ‘मोठ्या प्रमाणात’ असा उल्लेख असल्याचा आरोप त्यांनी केला होता. जवळपास महिनाभर कारागृहात राहिल्यानंतर आर्यन खानची 28 ऑक्टोबर 2021 रोजी जामिनावर सुटका झाली होती.

रेड चिलीज एंटरटेन्मेंट निर्मित ‘द बॅड्स ऑफ’मध्ये बॉबी देओल, लक्ष्य, मोना सिंह आणि साहेर बंबा यांसारख्या कलाकारांच्या भूमिका आहेत. त्याचसोबत सलमान खान, आमिर खान, रणवीर सिंह आणि करण जोहर यांसारख्या मोठमोठ्या सेलिब्रिटींनी यामध्ये पाहुण्या कलाकारांची भूमिका साकारली आहे. ही वेब सीरिज आजपासून (गुरुवार) नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.