10 दिवसांत 6243 कोटी रुपयांची छप्परफाड कमाई; दोन चित्रपटांनी रचला मोठा इतिहास

या दोन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या दोन्ही चित्रपटांनी मिळून जगभरात तब्बल 6000 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे. हे दोन चित्रपट कोणते आहेत आणि त्यांना इतका जोरदार प्रतिसाद का मिळतोय, ते जाणून घेऊयात..

10 दिवसांत 6243 कोटी रुपयांची छप्परफाड कमाई; दोन चित्रपटांनी रचला मोठा इतिहास
मायकल
Image Credit source: Youtube
| Updated on: May 05, 2026 | 11:14 AM

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर यशानंतर एकीकडे भारतीय बॉक्स ऑफिसवर शुकशुकाट असताना दुसरीकडे हॉलिवूडमध्ये दोन चित्रपटांनी गेल्या 10 दिवसांत धुमाकूळ घातला आहे. 24 एप्रिल रोजी ‘मायकल’ हा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला आला, त्यानंतर 1 मे रोजी ‘द डेव्हिल वियर्स प्राडा 2’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हे दोन्ही चित्रपट 2026 मधील ग्लोबल हिट बनले आहेत. जाफर जॅक्सनची मुख्य भूमिका असलेल्या ‘मायकल’ने दहा दिवसांत जगभरात तब्बल 400 दशलक्ष डॉलर्सपेक्षाही अधिक कमाई केली आहेत, तर दुसरीकडे मेरिल स्ट्रीप आणि अॅनी हॅथवे यांच्या ‘द डेव्हिल वियर्स प्राडा 2’ने पहिल्याच वीकेंडला रेकॉर्डब्रेक 233.6 दशलक्ष डॉलर्सचा गल्ला जमवला आहे. या दोन्ही चित्रपटांची कमाई जोडली असता हॉलिवूडच्या झोळीत दहा दिवसांत तब्बल 6253 कोटी रुपयांचा वर्षाव झाला आहे.

अँटोनी फुक्वा दिग्दर्शित ‘मायकल’ हा चित्रपट पहिल्याच वीकेंडला सर्वाधिक कमाई करणारा म्युझिकल बायोपिक बनला. त्याचप्रमाणे डेव्हिड फ्रँकल दिग्दर्शित ‘द डेव्हिल वियर्स प्राडा 2’ या चित्रपटाने ओपनिंग वीकेंडला सर्वाधिक कमाई करत हॉलिवूडमध्ये विक्रम रचला. फक्त हॉलिवूडमध्येच नाही तर भारतातही या दोन्ही चित्रपटांची क्रेझ पहायला मिळतेय. 2006 मध्ये ‘द डेव्हिल वियर्स प्राडा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचाच हा सीक्वेल तब्बल वीस वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचे भारतात 1500 हून अधिक शोज असून त्यातून 3.85 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने भारतात एकूण 15.91 कोटी रुपये कमावले आहेत.

‘द डेव्हिल वियर्स प्राडा 2’ने हॉलिवूडच्या प्रेक्षकांमध्ये जुन्या आठवणी जागवल्या आहेत. वीस वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे. यामध्ये मेरिल स्ट्रीप, अॅन हॅथवे, एमिली ब्लंट आणि स्टॅनली टुची यांच्या मुख्य भूमिका आहेत. फॅशन थीमवर आधारित या चित्रपटाला जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या याच्या पहिल्या भागाने 326 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली होती.

दुसरीकडे ‘मायकल’ने अवघ्या 10 दिवसांत जगभरात 4033 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. हा जगभरात आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा दुसरा म्युजिकल बायोपिक ठरला आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवरही ‘मायकल’ची क्रेझ पहायला मिळतेय. दहा दिवसांत या चित्रपटाने भारतात 36.32 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

Follow Us