The Kerala Story | ‘वडिलांवर थुंकून ये’ सीननंतर अभिनेत्रीच्या मनावर झाला असा परिणाम; म्हणाली “मन घट्ट करून..”

| Updated on: May 21, 2023 | 9:16 AM

आसिफाची भूमिका साकारल्यानंतर सोनियाला सोशल मीडियावर धमक्याही मिळत आहेत. "या धमक्यांमुळे मला भिती वाटत नाही अशातला भाग नाही. आजकाल लोक फार संवेदनशील झाले आहेत. यामुळे मी काही काळ बाहेर जाणं टाळत होते," असं ती म्हणाली.

The Kerala Story | वडिलांवर थुंकून ये सीननंतर अभिनेत्रीच्या मनावर झाला असा परिणाम; म्हणाली मन घट्ट करून..
Sonia Balani
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : ‘बडे अच्छे लगते है’ या लोकप्रिय मालिकेत राम कपूर आणि साक्षी तंवर यांच्या मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनिया बलानी सध्या ‘द केरळ स्टोरी’मधील भूमिकेमुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिने आसिफाची नकारात्मक भूमिका साकारली आहे. ‘द केरळ स्टोरी’ने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत जवळपास 178 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या कमाईबाबत सोनिया खुश आहे, मात्र तिला हे यश साजरं करायचं नाहीये, असं ती म्हणाली. चित्रपटातील भूमिकेमुळे तिला गेल्या काही दिवसांपासून धमक्याही मिळत आहेत.

हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सोनिया म्हणाली, “या चित्रपटाची कथा खरी आणि मनाला भिडणारी असल्याने माझ्या संमिश्र भावना आहेत. जर हा एखादा रोमँटिक कॉमेडी चित्रपट वगैरे असता तर कदाचित मी खुश असते. लोकांकडून त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय, याचा मला आनंदच आहे. पण कुठेतरी हे सगळं खरं घडलंय या भावनेमुळे यश साजरा करावासा वाटत नाहीये.”

हे सुद्धा वाचा

चित्रपटातील स्वत:च्याच काही दृश्यांमुळे मनातून खूप वाईट वाटल्याची भावना सोनियाने यावेळी व्यक्त केली. “जेव्हा मी माझ्या मैत्रिणीलाच सांगते की वडिलांवर थुंकून ये, तेव्हा त्या सीनचा माझ्यावर खूप परिणाम झाला होता. तो सीन करण्यासाठी मला माझं मन घट्ट करावं लागलं होतं. शूटिंग संपल्यानंतर मी जेव्हा घरी परतायचे, तेव्हा माझ्या डोक्यात सतत तेच विचार असायचे. कारण हे सगळं खरं घडलंय हे आम्हाला माहीत होतं. इतकंच नव्हे तर चित्रपटात काम करताना माझ्या ऊर्जेत बदल झाल्याचंही सहकलाकार म्हणत होते”, असं तिने सांगितलं.

‘द केरळ स्टोरी’मधील आसिफाची भूमिका न साकारण्याचा सल्ला अनेकांनी सोनियाला दिला होता. याविषयी ती म्हणाली, “माझ्याकडे दोन पर्याय होते. मी दुसऱ्या एखाद्या मुलीची भूमिका साकारू शकत होते किंवा आसिफा. चौकटीबाहेरच्या भूमिका साकारून मला अभिनेत्री म्हणून माझ्या कक्षा रुंद करायच्या होत्या. म्हणूनच मी आसिफाची भूमिका साकारली होती.”

आसिफाची भूमिका साकारल्यानंतर सोनियाला सोशल मीडियावर धमक्याही मिळत आहेत. “या धमक्यांमुळे मला भिती वाटत नाही अशातला भाग नाही. आजकाल लोक फार संवेदनशील झाले आहेत. यामुळे मी काही काळ बाहेर जाणं टाळत होते. काही होऊ शकत नाही, पण तरीही काही झालं तर काय, असा प्रश्न मनात येतो. मी अशा घटनांबद्दल खूप वाचले आहे. त्यामुळे मी काळजी घेत आहे. सुदैवाने माझे कुटुंबीय माझ्या पाठिशी आहेत”, असं समाधान तिने व्यक्त केलं.