चित्रपटाने पहिल्याच दिवशी गाजवलं बॉक्स ऑफिस, थेट ‘हनुमान अंश’ला टक्कर; आकडा पाहून बसेल धक्का!
The Paradise Box Office Collection: नुकताच एक असा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे, ज्याची तुलना थेट ब्लॉकबस्टर 'हनुमान अंश' या चित्रपटाशी होत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी धमाकेदार कमाई केली आहे.

The Paradise Box Office Collection: साऊथचा लोकप्रिय अभिनेता नानी याचा बहुप्रतिक्षित ‘द पॅराडाईज’ हा चित्रपट 24 सप्टेंबरला सिनेमागृहात दाखल झाला. रिलीजपूर्वीपासूनच या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. दमदार अॅक्शन, मोठा स्केल आणि नानीची लोकप्रियता यामुळे चित्रपटाकडून मोठ्या ओपनिंगची अपेक्षा केली जात होती. आता पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आल्यानंतर ‘द पॅराडाईज’ने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केल्याचं दिसत आहे. ट्रेड ट्रॅकिंग वेबसाइट ‘सॅकनिल्क’च्या आकडेवारीनुसार, ‘द पॅराडाईज’ने भारतात पहिल्या दिवशी 34.65 कोटी रुपयांची नेट कमाई केली. चित्रपटाने 9,732 शोच्या माध्यमातून ही कमाई केली असून भारतातील ग्रॉस कलेक्शन सुमारे 54.90 कोटी रुपये असल्याचं वृत्त आहे. परदेशातील कमाई जोडल्यास चित्रपटाचा पहिल्या दिवसाचा वर्ल्डवाइड ग्रॉस 74.90 कोटी रुपये आहे.
भारतातील भाषानिहाय कमाईत तेलुगू व्हर्जनचा मोठा वाटा आहे. चित्रपटाने तेलुगूमध्ये सुमारे 42.90 कोटी, हिंदीमध्ये 2.25 कोटी आणि तमिळमध्ये 1.10 कोटी रुपयांची कमाई केल्याचं समजतंय. ‘द पॅराडाईज’ने पहिल्याच दिवशी केलेली कमाई नानीच्या करिअरसाठीही महत्त्वाची ठरली आहे. रिलीजपूर्वीच अॅडव्हान्स बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळाला होता. नॉर्थ अमेरिका आणि इतर परदेशी बाजारपेठांमध्येही नानीच्या चाहत्यांनी चित्रपटाला प्रतिसाद दिला.
पहा ट्रेलर-
या चित्रपटाचं दिग्दर्शन श्रीकांत ओडेला यांनी केलं आहे. नानीसोबत राघव जुयाल, कायडू लोहा आणि मोहन बाबू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा अॅक्शन ड्रामा असल्यामुळे चित्रपटातील अॅक्शन सीक्वेन्स आणि नानीची भूमिका प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. ‘द पॅराडाईज’च्या दमदार ओपनिंगनंतर सध्या त्याची तुलना ‘हनुमान अंश’च्या बॉक्स ऑफिस रनशी होत आहे. ‘हनुमान अंश’ने सातव्या आठवड्यातही आपली कमाई सुरू ठेवली आहे. 24 सप्टेंबरच्या 49व्या दिवशी या चित्रपटाने भारतात 3.65 कोटी रुपयांची नेट कमाई केली आणि त्याची वर्ल्डवाइड कमाई 377.05 कोटी रुपयांवर पोहोचली.
मात्र दोन्ही चित्रपटांच्या कमाईची तुलना करताना त्यांचा रिलीज कालावधी आणि थिएटरमधील दिवस लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. ‘द पॅराडाईज’ने अद्याप आपली थिएट्रिकल रन सुरू केली आहे, तर ‘हनुमान अंश’ सात आठवडे पूर्ण करूनही प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. आता ‘द पॅराडाईज’च्या पहिल्या वीकेंडमध्ये कमाईचा वेग किती वाढतो आणि नानीचा हा अॅक्शनपट बॉक्स ऑफिसवर किती मोठा टप्पा गाठतो, याकडे सिनेसृष्टीचं लक्ष लागलं आहे.