निधनापूर्वी दिला 388 कोटींचा ब्लॉकबस्टर; एकेकाळी बॉलिवूड सोडून स्वीकारलेला अध्यात्म
ऐशीच्या दशकात सुपरस्टार्सच्या यादीत एक असा अभिनेता होता, ज्यांनी स्वत:च्या बळावर इंडस्ट्रीत मोठं नाव कमावलं. त्यांचा फीमेल फॅन फॉलोइंग प्रचंड होता. परंतु करिअरच्या शिखरावर असतानाच ते बॉलिवूड सोडून अध्यात्माकडे वळले होते.

ऐशीच्या दशकात बॉलिवूडमध्ये अनेक मोठे स्टार होऊन गेले. त्यात एक असा सुपरस्टार होता, ज्याच्या व्यक्तीमत्त्वाने, देखण्या रुपाने आणि स्टारडमने मोठमोठे कलाकारसुद्धा थक्क झाले होते. या स्टारने स्वत:च्या जोरावर ते सर्व शक्य करून दाखवलं, जे सिनेसृष्टीत क्वचितच एखाद्याला जमतं. बॉलिवूड इंडस्ट्रीत मोठं नाव कमावूनही करिअरच्या शिखरावर असताना त्यांनी अभिनयक्षेत्र सोडलं आणि संन्यास घेऊन कुटुंबाचाही त्याग केला. काही काळ अध्यात्माचा अनुभव घेतल्यानंतर ते पुन्हा चित्रपटसृष्टीकडे वळले आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांनी त्यांच्यावर तेवढंच प्रेम केलं. ज्या हिरोविषयी आम्ही बोलतोय, ते दुसरे-तिसरे कोणी नसून दिवंगत अभिनेते विनोद खन्ना आहेत.
विनोद खन्ना यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलं. कुर्बानीपासून द बर्निंग ट्रेन आणि चांगनी यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलेल्या विनोद खन्ना यांच्याकडे बॉलिवूडमधील सर्वांत दमदार आणि हँडसम अभिनेते म्हणून पाहिलं जात होतं. ते असे एकमेव अभिनेते होते, ज्यांनी स्टारडमच्या बाबतीत अमिताभ बच्चन यांनाही तगडी टक्कर दिली होती. 1968 मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. ‘मन का मीत’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. परंतु बॉक्स ऑफिसवर तो फ्लॉप ठरला होतं. नंतर त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.
विनोद खन्ना यांचं निधन 2017 मध्ये झालं होतं. निधनाच्या दोन वर्षांपूर्वी त्यांचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि त्याचं नाव होतं ‘दिलवाले’. यामध्ये शाहरुख खान, काजोल, वरुण धवन आणि क्रिती सनॉन यांच्यासोबत त्यांनी काम केलं होतं. या चित्रपटात त्यांनी शाहरुखचे ऑनस्क्रीन वडील रणधीर बक्क्षीची भूमिका साकारली होती. ‘दिलवाले’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 388 कोटी रुपयांची कमाई केली होती.
विनोद खन्ना यांनी करिअरच्या शिखरावर असताना संन्यास घेतला होता. 1977 मध्ये अचानक एकेदिवशी त्यांनी सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. कारण काही चित्रपटांचं काम अर्ध्यावरच थांबलं होतं. परत आल्यानंतर त्या सर्व चित्रपटांचे शूटिंग पूर्ण करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं. विनोद खन्ना ओशोंमुळे प्रचंड प्रभावित झाले होते. 1981 मध्ये ते अमेरिकेतल्या के. के. ओरेगनमध्ये ओशोंच्या आश्रमात जाऊन राहू लागले होते. तिथे ते संन्यासींच्या वेशभूषेत राहत होते. या आश्रमात ते सर्वसामान्यांसारखे सर्व कामं करत होते. आश्रमात पाच वर्षे राहिल्यानंतर त्यांनी 1987 मध्ये चित्रपटसृष्टीत कमबॅक केलं आणि रखडलेले सर्व प्रोजेक्ट्स पूर्ण केले.