Tukaram Mundhe Biopic : तुकाराम मुंढेंवर उद्या चित्रपट आलाचं, तर बॉलिवूडच्या दोन टॉप हिरोंमध्ये स्पर्धा, परफेक्ट कोण हे तुम्हीच ठरवा
तुकाराम मुंढे यांच्या नावाची सध्या राज्यभर चर्चा आहे. त्यातच त्यांच्या जीवनावर बायोपिक बनवण्याबद्दल उत्सुकता वाढली आहे. सोशल मीडियावर मुंढे यांच्या भूमिकेसाठी के.के. मेनन आणि अक्षय कुमार यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) धडाकेबाज कारवायांमुळे सध्या राज्यात अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची जोरदार चर्चा सुरू आहे. भेसळयुक्त पनीर आणि दूध असो किंवा अस्वच्छ रेस्टॉरंट्स, डॉमिनोज आणि बर्गर किंगसारख्या आऊटलेट्सवरची कारवाई असो, FDAकडून सातत्याने कठोर पावलं उचलली जात आहेत. या कारवायांमुळे तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. तुकाराम मुंढे हे त्यांच्या कडक शिस्तीच्या, स्पष्टवक्तेपणाच्या आणि धडाकेबाज कार्यशैलीसाठी ओळखले जातात. त्यातच आता त्यांच्या आयुष्यावर बायोपिक बनण्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. भविष्यात त्यांच्या जीवनावर चित्रपट बनला, तर मुंढे यांची भूमिका कोणता अभिनेता प्रभावीपणे साकारू शकेल, यावर नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
के. के. मेननच्या नावाला पसंती
सोशल मीडियावर समोर आलेल्या एका पोस्टमध्ये अभिनेता के. के. मेनन (KK Menon) यांचं नाव तुकाराम मुंढे यांच्या भूमिकेसाठी सुचवण्यात आलं आहे. मेनन यांची गंभीर आणि संयत अभिनयशैली, दमदार स्क्रीन प्रेझेन्स आणि अधिकारशाही भूमिका प्रभावीपणे साकारण्याची क्षमता पाहता ते या भूमिकेसाठी योग्य ठरू शकतात, असं अनेक युजर्सचं मत आहे.
एका युजरने के. के. मेनन यांच्या शांत आणि संयत व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करत ते मुंढे यांच्या भूमिकेसाठी योग्य पर्याय असल्याचं म्हटलं. तर, “ही भूमिका के. के. मेनन यांच्यासाठीच बनली आहे,” अशी प्रतिक्रिया देखील एका युजरने दिली आहे.
अक्षय कुमारचंही नाव चर्चेत
दरम्यान, काही सोशल मीडिया युजर्सनी अभिनेता अक्षय कुमारचं नावही या भूमिकेसाठी सुचवलं आहे. के. के. मेनन आणि अक्षय कुमार यांच्यात तुलना करताना मात्र अनेकांनी तुकाराम मुंढे यांच्या भूमिकेसाठी मेनन यांना अधिक पसंती दिल्याचं दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर ‘तुकाराम मुंढे यांच्या भूमिकेसाठी के. के. मेनन की अक्षय कुमार?’ असा पोलही चर्चेत आला. “सॉरी अक्षय कुमार… तुकाराम मुंढेंच्या बायोपिकमध्ये काम करण्याची तुझी इच्छा कदाचित पूर्ण होणार नाही,” असं काही चाहत्यांनी मजेशीर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.
सध्या तरी तुकाराम मुंढे यांच्या बायोपिकबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, सोशल मीडियावरील या चर्चेमुळे भविष्यात असा चित्रपट प्रत्यक्षात आला तर मुंढेंची भूमिका कोण साकारणार, याची उत्सुकता आतापासूनच निर्माण झाली आहे.