अगं बाई थांब…! मुंबईत भरधाव वाहनाचा धुमाकूळ! कार थेट पोलिसांच्या अंगावर…थरार कॅमेऱ्यात कैद
मुंबईत एका भरधाव वाहनाने धुमाकूळ घातला. महिला कार चालकाने थेट पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आलं आहे.

मुंबईत पुन्हा एकदा हिट अँड रनसारखी घटना घडली आहे. मुंबईच्या जुहूमध्ये भरधाव कारने धुमाकूळ घातला. जुहूमध्ये महिलेच्या भरधाव कारने पोलिसांनाही गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. जुहू परिसरात या महिलेने स्कूटर, दुचाकी आणि कारला धडक दिल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर रस्त्यावर एकच खळबळ उडाली.
जुहूमध्ये कार चालवणाऱ्या महिलेने अपघातानंतर गाडी पुढे दामटल्याची माहिती आहे. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु या महिलेने गाडी न थांबवता पोलिसांना देखील गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. संबंधित घटनेचे चित्रीकरण करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने गाडीचा मागील दरवाजा उघडून महिलेला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित महिलेने स्वतः व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू करत पोलिसांवरच उलट आरोप केल्याचा दावा करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांकडून कारवाई सुरू असल्याची माहिती आहे.
नेमकं काय घडलं?
मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी रात्री साडे आठ वाजता संगीत भारती चौकाच्या सिग्नलजवळ ही घटना घडली. पोलिसांच्या दाव्यानुसार, एका महिला कार चालकाने सिग्नलवर उभ्या कार आणि वाहनांना धडक मारली. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस कर्मचारी प्रशांत हाके हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या महिला चालकाला कार बाजूला घेण्याची मागणी केली. परंतु कार चालक महिलेने गाडी दामटल्याचा आरोप आहे. या घटनेचा थरार रस्त्यावर उपस्थित लोकांनी व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला. सिग्नलवर उभ्या असलेल्या ज्या कारला धडक दिली. त्या कार मालकाने संबंधित महिलच्या विरोधात जुहू पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, वाहतूक पोलीस कर्मचारी महिला चालकाला गाडी थांबवण्यासाठी आवाज देते. त्यानंतर महिला चालक ऐकत नसल्याचे दिसत आहे. अपघातानंतर वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस पोहोचले होते. परंतु संबंधित महिलेने पोलिसांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. पोलीस कर्मचाऱ्याने धाव घेऊन थांबवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु या कार चालक महिलेने ऐकलं नाही. त्यामुळे पोलिसांनी संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद केला.
