‘बाई तुझा आशीर्वाद’ मालिकेतील अवनीचा खास तुलाविधी सोहळा; सुनेच्या वजनाइतके आंबे अर्पण
स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचं नाव आहे 'बाई तुझा आशीर्वाद'. या मालिकेतील अवनीचा खास तुलाविधी सोहळा नुकताच पार पडला. यावेळी तिच्या वजनाइतके आंबे दान करण्यात आले.

स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु होणाऱ्या ‘बाई तुझा आशीर्वाद’ या मालिकेत दांगट कुटुंबात सुनेच्या म्हणजेच अवनीच्या रूपाने आनंदाची चाहूल लागली आहे. नव्या सुनेचं स्वागत जल्लोषात करण्यासाठी अक्षय तृतीयेचं निमित्त साधत दांगट कुटुंबाने अवनीचा भव्यदिव्य तुलाविधी केला. ढोल-ताशे आणि लेझीम खेळत अवनीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. सगळ्या कुटुंबाने मिळून तिचं औक्षण केलं. सोहळ्याचं मुख्य आकर्षण ठरलेल्या तुलाविधीमध्ये अवनीच्या वजनाइतके आंबे अर्पण करण्यात आले. उपस्थित सगळ्यांसाठीच हा क्षण भारावणारा होता. सासरे आणि दिरांचं हे प्रेम पाहून अवनीच्या डोळ्यांतही आनंदाश्रू दाटले होते. प्रेम आणि आपुलकीने न्हालेला हा तुलाविधी सोहळा मालिकेतील नात्यांचा गोडवा अधोरेखित करणारा ठरला.
मराठी मालिका विश्वात नेहमीच समाजाशी निगडित आणि विचार करायला लावणारे विषय मांडणारी स्टार प्रवाह वाहिनी ‘बाई तुझा आशीर्वाद’ या मालिकेच्या निमित्ताने नवा विषय प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. घर चालवणारी, जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणारी, नात्यांमध्ये समतोल साधणारी, स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी झगडणारी आणि घराला पूर्णत्व देणारी स्त्री म्हणजेच ‘बाई’ या मालिकेच्या केंद्रस्थानी आहे. ज्या घराला बाईच्या असण्याचीच सवय नाही, अशा पूर्णपणे पुरुषप्रधान घरात अवनीचं आगमन होतं… आणि तिथूनच सुरू होतो नात्यांचा नवा प्रवास. तिच्या येण्याने त्या घरात फक्त एक व्यक्ती नाही, तर समज, संवाद, आपुलकी आणि घरपण येतं.
‘बाई तुझा आशीर्वाद’ ही मालिका ठामपणे सांगते की बाई म्हणजे केवळ घर चालवणारी व्यक्ती नाही, तर ती घराला घर बनवणारी शक्ती आहे. ही नवी मालिका येत्या 27 एप्रिलपासून रात्री 10 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत नवोदित अभिनेत्री अक्षता अनिता प्रमोद ही अवनीची भूमिका साकारणार आहे. रुईया कॉलेजमधून फिलॉसॉफी विषयात ड्रिग्री घेतलेल्या अवनीला लहानपणापासूनच अभिनय क्षेत्र खुणावत होतं. सात वर्षांची असतानाच तिने कथ्थक शिकायला सुरुवात केली. अवनीच्या नृत्यकलेतूनच तिला तिच्या आयुष्यातली ‘स्टार’ ही पहिली एकांकिका मिळाली. ही एकांकिका खूप गाजली. त्यानंतर गुड बाय किस, अत्तरमन अश्या अनेक एकांकिका अवनीने केल्या. याच दरम्यान तिला बाई तुझा आशीर्वाद या मालिकेतल्या अवनी या मुख्य नायिकेच्या भूमिकेसाठी विचारणा झाली.