
ढोल-ताशाच्या गजरात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळात बुधवारी गणपती बाप्पाचं आगमन झालं. अनेक टीव्ही आणि बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरातही बाप्पाचं स्वागत करण्यात आलं, मनोभावे पूजा आणि आरती करण्यात आली. अशाच एका आरतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु या व्हिडीओवरून काही नेटकरी सेलिब्रिटींवर चिडले आहेत. प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीच्या घरातील हा व्हिडीओ आहे. टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील इतरही काही सेलिब्रिटी त्याच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला पोहोचले होते. या सर्वांनी मिळून गणपतीची आरती केली. परंतु आरती करताना त्यांचा डान्स पाहून नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. गणपतीच्या आरतीची ही कोणती पद्धत, असा सवाल अनेकांनी केला आहे.
या व्हिडीओमध्ये अभिनेत्री निया शर्मा, ख्रिस्टल डिसूझा यांसह अर्जुन बिजलानी आणि त्याची पत्नी थिरकताना दिसत आहेत. टीव्हीवर ‘अग्निपथ’ या चित्रपटातील गणपतीचं गाणं लावण्यात आलं आहे. याच गाण्याच्या शेवटी ‘घालीन लोटांगण’ या आरतीचं एक कडवं ऐकायला मिळतं. त्यावर या सर्व सेलिब्रिटींनी डान्स केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘प्रार्थना अशा पद्धतीने करायची नसते, ही लोकं जरा तरी गंभीर आहेत का’, असा प्रश्न एकाने विचारला. तर ‘नौटंकी चालू आहे’ असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘आरतीवर अशा प्रकारे नाचत नाहीत’, असंही काहींनी लिहिलं आहे. ‘आमच्या मराठी कलाकारांकडून शिका. देवांचा आदर कसा करायचा ते? नुसती हाताने मुर्ती बनवून काही होत नाही. ही पूजा कमी पार्टी जास्त वाटत आहे,’ अशा शब्दांत नेटकऱ्यांनी टीका केली.
अनेक टीव्ही सेलिब्रिटींच्या घरातही बुधवारी गणरायाचं आगमन झालं. अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या घरातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी तिच्याही घरी अशाच पद्धतीने सेलिब्रिटींना नाचताना पाहिलं गेलं. त्यावरून नेटकऱ्यांनी या सेलिब्रिटींना ट्रोल केलंय. सर्वजण ढोंगी आहेत, ही आपली संस्कृती नाही, देवाची पूजा अशी केली जात नाही, असं म्हणत नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.