नंदमुरी बालकृष्ण यांच्यासोबतच्या आक्षेपार्ह डान्सला उर्वशी म्हणाली ‘कला’; नेटकरी अवाक्!

अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि नंदमुरी बालकृष्ण यांच्या 'डबिडी डिबिडी' या गाण्यावरून नेटकरी प्रचंड ट्रोल करत आहे. या गाण्यातील स्टेप्स आक्षेपार्ह असल्याचं म्हटलं जात आहे. त्यावर आता उर्वशीने प्रतिक्रिया दिली आहे.

नंदमुरी बालकृष्ण यांच्यासोबतच्या आक्षेपार्ह डान्सला उर्वशी म्हणाली कला; नेटकरी अवाक्!
Nandamuri Balakrishna and Urvashi Rautela
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 16, 2025 | 10:17 AM

अभिनेत्री उर्वशी रौतेला गेल्या काही दिवसांपासून तिच्या एका गाण्यामुळे सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. तिच्या ‘डाकू महाराज’ या तेलुगू चित्रपटातील ‘डबिडी डिबिडी’ (Dabidi Dibidi) हे गाणं नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलं आहे. या गाण्यात उर्वशीने साऊथ सुपरस्टार नंदमुरी बालकृष्ण यांच्यासोबत डान्स केला. मात्र त्याच डान्सवरून नेटकऱ्यांनी उर्वशीला प्रचंड ट्रोल केलंय. या गाण्यात 64 वर्षीय बालकृष्ण यांनी ज्याप्रकारे 30 वर्षीय उर्वशीसोबत डान्स केला, ते पाहून नेटकऱ्यांनी आक्षेप नोंदवला. ‘हा काय विचित्र प्रकार आहे’, असा सवाल नेटकऱ्यांनी केला. या गाण्यावरून उर्वशी आणि बालकृष्ण यांना ट्रोल केल्यानंतर आता अभिनेत्रीने त्यावर मौन सोडलं आहे.

IANS ला दिलेल्या मुलाखतीत उर्वशी म्हणाली, “यश हे अनिवार्यपणे टीकेलाही आमंत्रित करतं. माझ्या मते चर्चा आणि विविध मतं हा या प्रवासाचाच एक भाग आहे. नंदमुरी यांच्यासोबतच्या डान्सबद्दल बोलायचं झाल्यास, मी कोणत्याही परफॉर्मन्स असला तरी त्यातील विविध दृष्टीकोनांचा आदर करते. त्यांच्यासारख्या महान व्यक्तीसोबत काम करण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची बाब आहे. सहकार्य, परस्पर आदर आणि कलाकृतीबद्दल असलेली आवड या सर्वांचा तो अनुभव होता.”

‘डबिडी डिबिडी’ या गाण्याशिवाय उर्वशी आणि नंदमुरी बालकृष्ण यांचा ‘डाकू महाराज’ या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीतील एक व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर तुफान चर्चेत होता. या व्हिडीओमध्ये बालकृष्ण यांच्यासोबत नाचताना उर्वशीला प्रचंड संकोचलेपणा जाणवल्याचं दिसून आलं होतं. त्यावरही तिने या मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे. “नंदमुरी यांच्यासोबतचा डान्स हा माझ्यासाठी फक्त परफॉर्मन्स नाही तर कला, मेहनत आणि कलेविषयी असलेल्या आदराचं सेलिब्रेशन आहे. त्यांच्यासोबत काम करून माझं स्वप्न सत्यात उतरलंय. प्रत्येक स्टेप, प्रत्येक हावभाव हे काहीतरी सुंदर निर्मितीसाठीच होतं”, असं ती म्हणाली.

‘डाकू महाराज’ या चित्रपटात नंदमुरी बालकृष्ण आणि उर्वशी रौतेला यांच्या भूमिका असून सध्या थिएटरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यामध्ये बॉबी देओल, श्रद्धा श्रीनाथ, प्रज्ञा जैस्वाल, मकरंद देशपांडे आणि इतरही कलाकारांच्या भूमिका आहेत.