
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडाचा बहुचर्चित ‘किंग्डम’ हा चित्रपट येत्या 31 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. गौतम तिन्नानुरी दिग्दर्शित हा चित्रपट जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार असून त्याच्या ॲडव्हान्स बुकिंगला दमदार सुरुवात झाली आहे. विजयचा हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच अमेरिकेतून कोट्यवधी रुपयांची कमाई झाली आहे.
29 जुलैपर्यंत ‘किंग्डम’ या चित्रपटाची 22,205 तिकिटं उत्तर अमेरिकेत विकली गेली आहेत. त्यापैकी 20,671 तिकिटं अमेरिकेत आणि 1534 तिकिटं कॅनडामध्ये विकली गेली आहेत. यातून चित्रपटाने उत्तर अमेरिकेतून 4 लाख 26 हजार अमेरिकन डॉलर्सची कमाई केली आहे. म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये त्याचं रुपांतर केल्यास, या चित्रपटाने दोन्ही देशांमधून 3.5 कोटी रुपये जमा केले आहेत.
‘किंग्डम’चे उत्तर अमेरिकेत 792 शोज आहेत. अमेरिकेत 763 शोज आणि कॅनडामध्ये 29 शोज झाले आहेत. आता या चित्रपटाने प्रदर्शित होण्यापूर्वीच उत्तर अमेरिकेत 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. त्यामुळे थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरणार, अशी शक्यता चित्रपट व्यापार विश्लेषकांकडून वर्तवण्यात येत आहे. या चित्रपटाच्या रिलीजसाठी अजून दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे ॲडव्हान्स बुकिंगचे आकडे आणखी वाढू शकतात.
‘किंग्डम’मध्ये विजय देवरकोंडा एका गुप्तहेर एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यात त्याचा ॲक्शन अवतार प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री बोरसेची मुख्य भूमिका आहे. 26 जुलै रोजी निर्मात्यांनी या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. त्यानंतर त्याबद्दल चाहत्यांमध्ये आणखी उत्सुकता वाढली होती.
हा चित्रपट तेलुगू आणि तमिळ भाषेत ‘किंग्डम’ या नावाने प्रदर्शित होणार आहे. तर हिंदी भाषेसाठी त्यांनी याला ‘साम्राज्य’ असं नाव दिलंय. हिंदी व्हर्जनचा ट्रेलरसुद्धा याच नावाने प्रदर्शित झाला आहे. 26 जुलै रोजी ट्रेलर लाँचसाठी तिरुपतीमध्ये भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर 28 जुलै रोजी हैदराबादमध्ये प्री-रिलीज कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या दोन्ही कार्यक्रमांमध्ये चाहत्यांची मोठी गर्दी दिसून आली होती.