हा तर ‘रेड फ्लॅग’.., रश्मिकासोबतच्या नात्यावरून ट्रोल करणाऱ्यांना विजयचं भन्नाट उत्तर, म्हणाला..

‘कॉफी विथ करण’मधील वक्तव्यांवरून सुरू झालेलं ट्रोलिंग आणि विजयची उपरोधिक प्रतिक्रिया यामुळे हे जोडपं पुन्हा चर्चेत आलं आहे. काही जण विजयच्या भूमिकेचं समर्थन करत आहेत, तर काहींना त्याच्या वक्तव्यांबद्दल अद्याप आक्षेप आहेत.

हा तर रेड फ्लॅग.., रश्मिकासोबतच्या नात्यावरून ट्रोल करणाऱ्यांना विजयचं भन्नाट उत्तर, म्हणाला..
Vijay Deverakonda and Rashmika Mandanna
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 26, 2026 | 2:29 PM

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. नुकतंच हे जोडपं करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण 9’ या लोकप्रिय चॅट शोमध्ये सहभागी झालं होतं. या कार्यक्रमात दोघांनी त्यांच्या प्रेमकहाणीपासून लग्नापर्यंतचा प्रवास उलगडला. मात्र, शोमधील विजयच्या काही वक्तव्यांवरून सोशल मीडियावर त्याच्यावर टीका सुरू झाली. काही नेटकऱ्यांनी त्याला ‘रेड फ्लॅग’ अर्थात नात्यात त्रासदायक ठरू शकणारा जोडीदार म्हटलं. आता विजयने या ट्रोलिंगला थेट उत्तर न देता एका मजेशीर व्हिडीओच्या माध्यमातून टीकाकारांना टोला लगावला आहे.

‘कॉफी विथ करण 9’मध्ये विजय आणि रश्मिका यांच्या नात्याबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावेळी रश्मिकानेच विजयला लग्नासाठी विचारल्याचा खुलासा झाला. विजयने सांगितलं की, रश्मिकाने किमान शंभर वेळा तरी लग्नासाठी विचारलं होतं. या संवादातील काही भाग व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी विजयच्या बोलण्यावर आक्षेप घेतला. काहींना त्याची बोलण्याची पद्धत रश्मिकाला कमी लेखणारी वाटली, तर काहींनी त्याला अहंकारी आणि नात्यात वर्चस्व गाजवणारा म्हटलं. याशिवाय, विजय सोफ्यावर कसा बसला होता, त्याच्यासमोर कॉफीचा कप का होता आणि रश्मिकासमोर का नव्हता, अशा छोट्या गोष्टींवरूनही सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. काही नेटकऱ्यांनी तर या गोष्टींना ‘रेड फ्लॅग’शी जोडलं.

Loading...

विजयची प्रतिक्रिया-

सततच्या चर्चांदरम्यान विजयने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्यंगात्मक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये दोन कंटेंट क्रिएटर्स ‘कॉफी विथ करण’मधील विजय आणि रश्मिकाच्या संवादाचं अतिशयोक्तीपूर्ण विश्लेषण करताना दिसतात. विजयच्या बसण्याच्या पद्धतीपासून ते कॉफीच्या कपापर्यंत प्रत्येक गोष्टीत नकारात्मक अर्थ शोधला जातो. इतकंच नव्हे, तर रश्मिकाला इन्स्टाग्रामवर फॉलो करत नसल्याच्या मुद्द्यावरूनही त्याच्यावर टीका केली जाते. व्हिडीओमधून सोशल मीडियावर सेलिब्रिटींच्या प्रत्येक कृतीचा अर्थ लावणाऱ्यांची खिल्ली उडवण्यात आली आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना विजयने ‘Needs subtitles. Regional languages lo’ असं लिहिलं. म्हणजेच, ‘सबटायटल्सची गरज आहे, प्रादेशिक भाषांमध्ये’, असा त्याच्या प्रतिक्रियेचा अर्थ आहे. या पोस्टमधून विजयने सोशल मीडियावरील अतिविश्लेषणावर विनोदी पद्धतीने भाष्य केल्याचं दिसतं. विजय आणि रश्मिका यांनी 26 फेब्रुवारी 2026 रोजी लग्न केलं. या दोघांची ओळख ‘गीता गोविंदम’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर ‘डियर कॉम्रेड’मध्येही त्यांनी एकत्र काम केलं. त्यांच्या नात्याबद्दल अनेक वर्षांपासून चर्चा होती; मात्र लग्नानंतर त्यांनी चाहत्यांसमोर आपल्या नात्याचा नवा अध्याय उघड केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us