
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा केवळ सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक नाही तर तो एक यशस्वी बिझनेसमनदेखील आहे. त्याने अनेक ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली असून त्याचे प्रसिद्ध हॉटेलही असून त्याच्या अनेक शाखा आहेत. विराट कोहलीच्या वन8 कम्यून (One8 Commune) हॉटेलबद्दल ऐकलं नसेल असे फार कमी लोक आहेत. देशभरात या हॉटेलची 10 आऊटलेट्स असून मुंबई-दिल्लीत तर एकापेक्षा जास्त आऊटलेट्स आहेत. मुंबईत या हॉटेलची पहिली शाखा उघडली, त्याचं बॉलिवूडशी देखील कनेक्शन आहे.
किशोर कुमार यांच्या बंगल्यात आहे रेस्टॉरंट
विराट कोहलीचे वन8 कम्यून हे रेस्टॉरंट मुंबईतील जुहू येथे 2022 मध्ये उघडलं गेलं. विशेष म्हणजे हे रेस्टॉरंट दिग्गज गायक किशोर कुमार यांच्या जुन्या बंगल्यात आहे.त्याच्या रेस्टॉरंटच्या यूट्यूब चॅनलवरील एका व्हिडिओमध्ये कोहलीनेच हेल सांगितलं होतं, किशोर कुमार यांचं माझ्या हृदयात नेहमीच एक विशेष स्थान आहे असं त्याने नमूद केलं होतं. “त्यांची गाणी माझ्यासाठी खूप खास आहेत. मला जर कधी कोणी विचारलं की एखादा माणूस जिवंत असता आणि तुला भेटायला मिळालं असतं, तर ती व्यक्ती कोण असती. तेव्हा मी नेहमीच किशोर दा याचं नाव घेतो, कारण त्यांचे व्यक्तिमत्व खूप खास होतं.” असंही विराटने सांगितलं.
ग्लास पॅनेलने बनलंय छत
विराटच्या रेस्टॉरंटच्या नावाचा त्याच्या क्रिकेटशी एक विशेष संबंध आहे, कारण त्याच्या जर्सीवर 18 हा आकडा लिहिलेला असतो. त्यामुळे, One8 Commune आउटलेटच्या भिंतीवर त्याच्या जर्सीला एक विशेष स्थान असणे हेही स्वाभाविक आहे. रेस्टॉरंटमध्ये असलेल्या काचेच्या छतामधून भरपूर सूर्यप्रकाश येतो, ज्यामुळे वातावरण दिवसभर नैसर्गिक प्रकाशाने उजळून जातं.
एका बाऊल राईसची किंमत 318 रुपये
One8 Commune च्या जुहू येथील आऊटलेटच्या मेन्यूनुसार, तिथे एका बाऊल स्टीम्ड राईसची किंमत 318 रुपये आहे. तर एक तंदूरी रोटी आणि एक बेबी नान देखील 118 रुपयांना मिळतो. मिष्टान्नांमध्ये मस्केर्पोन चीजकेकचा समावेश आहे, ज्याची किंमत 748 रुपये आहे. तसेच पेट फूडची किंमत देखील 518 ते 818 रुपयांदरम्यान आहे.