आमिर खान-कियारा अडवाणीच्या जाहिरातीवरून हंगामा; विवेक अग्निहोत्रीही भडकले

आमिरच्या जाहिरातीवर टीकेचा भडीमार; नेमकं काय आहे प्रकरण?

आमिर खान-कियारा अडवाणीच्या जाहिरातीवरून हंगामा; विवेक अग्निहोत्रीही भडकले
Vivek Agnihotri and Aamir Khan
Image Credit source: Twitter
| Updated on: Oct 10, 2022 | 7:26 PM

मुंबई- अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांची एक जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या जाहिरातीतून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला जातोय. सोशल मीडियावर अनेकांनी या जाहिरातीवर टीका केली आहे. हिंदुंच्या भावना दुखावल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे. आता ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनीसुद्धा जाहिरात ट्विटरवर शेअर करत त्यावर निशाणा साधला आहे. ही जाहिरात बनवणारे मूर्ख आहेत, असंच थेट त्यांनी म्हटलंय.

जाहिरातीत नेमकं काय आहे?

एयू स्मॉल फायनान्स बँकेची ही जाहिरात आहे. यामध्ये आमिर खान आणि कियारा अडवाणी यांनी नवविवाहितांची भूमिका साकारली आहे. लग्नानंतर कारमधून ते घरी जात असतात. पाठवणीच्या वेळी कोणीच रडलं नाही, यावर ते एकमेकांशी चर्चा करत असतात. कारमधून उतरल्यानंतर हे लक्षात येतं की नवरा (आमिर खान) हा नवरीच्या (कियारा अडवाणी) घरी राहायला आला आहे. वधूच्या वृद्ध पालकांची काळजी घेण्यासाठी वर तिच्या घरी राहायला येतो. नववधू ही नवऱ्याच्या घरी गृहप्रवेश करण्याची प्रथा आहे. मात्र या जाहिरातीत आमिर खान वधूच्या घरी पहिलं पाऊल ठेवतो. त्यानंतर तो म्हणतो, “शतकांपासून चालू असलेल्या प्रथा चालूच ठेवण्यात काय अर्थ आहे? म्हणून आम्ही प्रत्येक बँकिंग परंपरेबाबत प्रश्न उपस्थित करतोय, ज्यामुळे तुम्हाला चांगली सेवा मिळू शकेल.”

विवेक अग्निहोत्री यांचं ट्विट-

‘मला हे समजत नाही की सामाजिक आणि धार्मिक प्रथा बदलण्यासाठी बँक कधीपासून जबाबदार आहेत? मला वाटतं या बँकेनं भ्रष्ट बँकिंग व्यवस्था बदलण्यासाठी काम करावं. अशी बकवास करतात आणि पुन्हा म्हणतात की हिंदू ट्रोल करतायत. मूर्ख,’ असं ट्विट अग्निहोत्रींनी केलंय.

या जाहिरातीवर सोशल मीडियावर जोरदार टीका केली जात आहे. इतकंच नव्हे तर जाहिरातीच्या निषेधार्थ अनेकांनी संबंधिक बँकेतील अकाऊंट बंद करण्याचा निर्णय केला आहे.