राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गुजरातला का? राज ठाकरेंचा थेट सवाल, कलाकारांना केलं आवाहन

चित्रपट पुरस्कार सोहळा गुजरातला हलवण्यावर राज ठाकरेंचा सवाल; म्हणाले, ‘वेळ निघून जाण्यापूर्वी भूमिका घ्या’; राष्ट्रीय पुरस्कारांवर राज ठाकरेंचं कलाकारांना आवाहन

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गुजरातला का? राज ठाकरेंचा थेट सवाल, कलाकारांना केलं आवाहन
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 10, 2026 | 4:44 PM

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या 72 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पुरस्कार सोहळा दिल्लीबाहेर आयोजित करण्याच्या निर्णयावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सवाल उपस्थित केले आहेत. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा सोहळा दिल्लीहून गुजरातला हलवण्यामागचं कारण काय, असा थेट प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच चित्रपटसृष्टीत मोठं योगदान असलेल्या महाराष्ट्रासह तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश किंवा तेलंगणासारख्या राज्यांमध्ये हा सोहळा का आयोजित करण्यात आला नाही असा सवालही त्यांनी केला.

राज ठाकरे यांनी म्हटलं की, दादासाहेब फाळके यांच्या महाराष्ट्रात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा सोहळा का होत नाही? चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील राज्यांचं मोठं योगदान आहे. त्यामुळे राष्ट्रीय पुरस्कारांची परंपरा दिल्लीहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा निर्णय नेमका कोणत्या कारणासाठी घेण्यात आला, हे स्पष्ट झालं पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

‘राष्ट्रीय पुरस्कारांची उज्ज्वल परंपरा का मोडली जातेय?’

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा सोहळा देशाच्या राजधानीत आयोजित करण्याची अनेक दशकांची परंपरा आहे. ही परंपरा अचानक का मोडली जात आहे असा सवाल राज ठाकरे यांनी केला. त्यांच्या मते, हा मुद्दा केवळ केवाडिया किंवा गुजरातमधील एखाद्या शहराचा नाही तर राष्ट्रीय पुरस्कारांच्या दीर्घकाळापासून सुरू असलेल्या परंपरेत बदल का केला जात आहे हा आहे.

याच पार्श्वभूमीवर त्यांनी देशातील विविध राज्यांच्या योगदानाचाही उल्लेख केला. देशाची प्रगती केवळ एका राज्याच्या योगदानामुळे झालेली नसून प्रत्येक प्रांताच्या योगदानातून देश उभा राहिला आहे असं त्यांनी म्हटलं.

‘गुजरातकेंद्रीकरणाचा प्रयत्न?’

राज ठाकरे यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या कार्यक्रमांचा तसेच प्रकल्पांचा उल्लेख करत देशात गुजरातकेंद्रीकरण होत असल्याचा आरोप केला. कॉमनवेल्थ स्पर्धा, 2023 क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना, परदेशी राष्ट्राध्यक्षांच्या भेटी आणि GIFT City सारख्या प्रकल्पांबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करतानाच आता दिल्लीचं महत्त्वही कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं. देशातील महत्त्वाच्या संस्थात्मक आणि राष्ट्रीय कार्यक्रमांचं केंद्र एका राज्याकडे झुकवण्याची ही प्रक्रिया योग्य नसल्याचं त्यांनी सूचित केलं.

कलाकारांनी आवाज उठवण्याचं आवाहन

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या स्थळबदलाविरोधात कलाकारांनी आणि चित्रपटसृष्टीतील व्यक्तींनी आवाज उठवावा, असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं आहे.

राज ठाकरे यांनी या संपूर्ण प्रकरणाकडे केवळ पुरस्कार सोहळ्याच्या स्थळबदलाच्या दृष्टिकोनातून न पाहता व्यापक प्रादेशिक अस्मितेच्या मुद्द्याशी जोडलं आहे. दख्खनच्या प्रांताची ओळख आणि अस्मिता धोक्यात येत असल्याचा इशारा त्यांनी दिला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us