
लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झालेल्या भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधनासाठी सर्वकाही एका क्षणात बदललं. 23 नोव्हेंबर 2025 रोजी स्मृती आणि संगीतकार पलाश मुच्छल लग्न करणार होते. परंतु लग्नाच्या दिवशीच स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने विवाह विधी पुढे ढकलण्यात आली. त्याच्या दुसऱ्या दिवशी पलाशसुद्धा आजारी पडला आणि त्यालाही रुग्णालयात दाखल करावं लागलं. या सर्व घडामोडींदरम्यान कोरिओग्राफ मेरी डीकोस्टाने पलाशसोबतचे फ्लर्टिंगच्या मेसेजेसचा स्क्रीनशॉट शेअर करताच एकच खळबळ उडाली. पलाशने स्मृतीची फसवणूक केली, अशा चर्चांना उधाण आलं आहे. अशातच मेरी डीकोस्टाने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट लिहित तिची बाजू मांडली आहे.
मेरी डिकोस्टाच्या नावानेच पलाशसोबतचे चॅट्स व्हायरल झाले होते. या चॅट्समध्ये पलाश तिच्याशी फ्लर्ट करताना दिसला होता. त्यावरून पलाशवर नेटकऱ्यांकडून जोरदार टीका झाली. आता मेरीने नवीन पोस्ट लिहित यू-टर्न घेतला आहे. ‘हा मुद्दा लक्षात घ्या: मी त्याला कधीच भेटले नाही’, अशी पोस्ट तिने लिहिली आहे. भेट झाली नसतानाही पलाशने मेरीला डीएम (डायरेक्ट मेसेज) का केला आणि स्मृती मानधनाशी रिलेशनशिपमध्ये असतानाही तिच्याशी का फ्लर्ट करत होता, असे प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत.
मे 2025 च्या एका मेसेजमध्ये पलाश मेरीला पोहायला जाण्यास सांगताना दिसतोय. जेव्हा ती त्यांच्या नात्याच्या स्टेटसबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करते किंवा तो तिच्या प्रेमात आहे की नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करते, तेव्हा पलाश प्रश्न टाळतो. मेरीला स्पष्ट उत्तर देण्याऐवजी तिने भेटण्यासाठी होकार द्यावा यासाठी तो प्रयत्न करतो. या चॅट्समुळे स्मृती आणि पलाश या जोडीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. या सर्व घडामोडींदरम्यान स्मृतीने तिच्या लग्नाशी संबंधित सर्व पोस्ट इन्स्टाग्रामवरून काढून टाकल्या. यात तिच्या साखरपुड्याची घोषणा करणारी रील आणि प्रपोजलच्या व्हिडीओचाही समावेश होता. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली. दरम्यान स्मृतीच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. परंतु लग्नाबाबत स्मृती किंवा पलाशकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही.