पलाशने स्मृती मानधनाला फसवलं? चॅट्स व्हायरल होताच चाहत्यांमध्ये खळबळ
पलाशच्या चॅट्सचे हे स्क्रीनशॉट्स व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. नेमकं काय घडलंय, हे चाहत्यांना जाणून घ्यायचं आहे. यावर अद्याप पलाश किंवा स्मृतीकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही. दरम्यान पलाशवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल 23 नोव्हेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार होते. सांगलीत लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली होती, मेहंदी आणि हळदीचा समारोहसुद्धा पार पडला होता. परंतु लग्नाच्या अवघ्या काही तास आधी स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची प्रकृती बिघडली. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने स्मृतीने तिचं लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. गोष्ट इथपर्यंत सर्वांना समजली होती. परंतु त्यानंतर स्मृतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नासंबंधीचे सर्व पोस्ट काढून टाकल्याने नेटकऱ्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आलं. यानंतर आता धक्कादायक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराची लक्षणे दिसू लागल्यानंतर त्यांना सांगलीतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर पलाशचीही तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे त्यालाही सांगली इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या सर्व घडामोडींदरम्यान स्मृतीने तिच्या लग्नाशी संबंधित सर्व पोस्ट इन्स्टाग्रामवरून काढून टाकल्या. यात तिच्या साखरपुड्याची घोषणा करणारी रील आणि प्रपोजलच्या व्हिडीओचाही समावेश होता. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली.
पलाशने स्मृतीला फसवलं?
या सर्व चर्चांदरम्यान इन्स्टाग्राम युजर मेरी डीकोस्टाने पलाशसोबतच्या तिच्या चॅटचे स्क्रीनशॉट शेअर केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. हे चॅट्स पलाश मुच्छलसोबतचे असल्याचा दावा संबंधित युजरने केला आहे. ज्या अकाऊंटवर चॅट्सचे स्क्रीनशॉट्स शेअर करण्यात आले होते, ते अकाऊंट आता डिअॅक्टिव्हेट करण्यात आलं आहे. परंतु रेडिटवर हे स्क्रीनशॉट्स व्हायरल होत आहेत.

मे 2025 च्या एका मेसेजमध्ये पलाश मेरीला पोहायला जाण्यास सांगताना दिसतोय. जेव्हा ती त्यांच्या नात्याच्या स्टेटसबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करते किंवा तो तिच्या प्रेमात आहे की नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करते, तेव्हा पलाश प्रश्न टाळतो. मेरीला स्पष्ट उत्तर देण्याऐवजी तिने भेटण्यासाठी होकार द्यावा यासाठी तो प्रयत्न करतो. या चॅट्समुळे स्मृती आणि पलाश या जोडीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान लग्न पुढे ढकलल्यानंतर पलाशची बहीण पलक मुच्छलने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. ‘स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीमुळे स्मृती आणि पलाश यांचं लग्न पुढे ढकलण्यात आलं आहे. या संवेदनशील काळात कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करण्याची आम्ही तुम्हा सर्वांना विनंती करतो’, असं तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं आहे.
