स्मृतीने लग्नाचे फोटो डिलिट केल्यानंतर पलाश मुच्छलच्या बहिणीची पहिली प्रतिक्रिया, भावाचा बचाव करताना म्हणाली..
क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाविषयी आता पलक मुच्छलने पोस्ट लिहिली आहे. स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने या दोघांचं लग्न पुढे ढकलण्यात आलं आहे. हे दोघं 23 नोव्हेंबर रोजी लग्न करणार होते.

विवाह विधीच्या अवघे काही तास आधी क्रिकेटपटू स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांची प्रकृती बिघडल्याने लग्नसोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. रविवारी 23 नोव्हेंबर रोजी दुपारी स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा विवाहसोहळा पार पडणार होता. परंतु सकाळी न्याहारीनंतर स्मृतीच्या वडिलांना छातीत दुखून अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यानंतर त्यांना सांगलीतल्या रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी हृदयविकाराची लक्षणं असल्याची माहिती दिली. या सर्व घडामोडींनंतर स्मृती आणि पलाशचा विवाहसोहळा पुढे ढकलल्याचं तिचे मॅनेजर तोहिन मिश्रा यांच्याकडून सांगण्यात आलं. इतकंच नव्हे तर स्मृतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मेहंदी, हळदीचे काही फोटो आणि साखरपुडा जाहीर करणारी एक रीलसुद्धा काढून टाकली. यावरून नेटकऱ्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर आता पलाशची बहीण आणि प्रसिद्ध गायिका पलक मुच्छालने निवेदन जारी केलं आहे.
‘स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीमुळे स्मृती आणि पलाश यांचं लग्न पुढे ढकलण्यात आलं आहे. या संवेदनशील काळात कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करण्याची आम्ही तुम्हा सर्वांना विनंती करतो’, असं तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केलं. सोमवारी पलाशचीही प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यालाही रुग्णालयात दाखल केलं होतं. डिस्चार्ज मिळाल्यानंतर पलाश त्याच्या कुटुंबीयांसोबत मुंबईला निघून आला, तर स्मृती अद्याप सांगलीतच आहे.
पलक मुच्छलची पोस्ट-

जोपर्यंत वडील पूर्णपणे ठीक होत नाहीत, तोपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय खुद्द स्मृतीने घेतल्याची माहिती तिचे मॅनेजर तोहिन मिश्रा यांनी दिली. त्यामुळे स्मृती आणि पलाशचं लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलं आहे. यादरम्यान स्मृतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील लग्नाशी संबंधित सर्व फोटो आणि व्हिडीओ काढून टाकले आहेत. स्मृतीने तिच्या टीममधील मैत्रिणींसोबत खास रील पोस्ट केला होता. ‘समझो हो ही गया’ या गाण्यावर डान्स करत तिने या व्हिडीओत साखरपुड्याची अंगठी दाखवली होती. तर पलाशने क्रिकेटच्या मैदानावर स्मृतीला प्रपोज केल्याचा व्हिडीओ पोस्ट केला. स्मृतीने हे सर्व पोस्ट आणि व्हिडीओ काढून टाकले आहेत.
