Sushma Jaywant : त्याच्या अंगावर कपडेही नव्हते…निर्मात्याच्या जाळ्यात अडकली, कॉम्प्रोमाइजसाठी दिलेला होकार; मराठी अभिनेत्रीनं सांगितला धक्कादायक प्रसंग
Sushma Jaywant : मराठी अभिनेत्री सुषमा जयवंतनं एका मुलाखतीत कास्टिंग काऊचचा धक्कादायक प्रसंग सांगितला आहे. काय म्हणाली अभिनेत्री? जाणून घ्या.

इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काऊचचे अनुभव येत असतात. त्याबद्दल अभिनेत्री अनेकदा भाष्य करतात. असाच धक्कादायक अनुभव ‘कमळी‘ फेम सुषमा जयवंतला आलेला. याबद्दल तिनं नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं आहे. सुषमा म्हणाली की, ‘एका चित्रपटाच्या ऑडिशनसाठी मी गेले होते. खूप मोठं बॅनर होतं. तिथे 15-20 मुली बसल्या होत्या. तिथे सगळ्यांसमोर त्यांनी थेट विचारलं की, ‘कोण कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे?’ मी तेव्हा खूप लहान होते. त्या वयाच्या हिशोबाने मला ‘कॉम्प्रोमाइज’ या शब्दाचा अर्थ समजला नव्हता. मला वाटलं, कॉम्प्रोमाइज म्हणजे जंगलात शूटिंग करावं लागणार, तिथे एसी नसेल, स्वच्छतागृह नसेल, अशा अनेक गोष्टींशी जुळवून घ्यावं लागणार.’
सुषमा जयवंतनं सांगितला प्रसंग
‘माझ्या डोक्यात कॉम्प्रोमाइजचा हाच अर्थ होता. मी एकटीनेच हात वर केला. तिथे बसलेल्या इतर मुलींकडे पाहून मी म्हणाले, ‘या मुली वेड्या आहेत का? करिअर करायचं असेल तर आयुष्यात कॉम्प्रोमाइज करावीच लागते ना?’ त्यानंतर त्यांनी मला वेगळं बोलावलं. त्यांनी विचारलं, ‘तुम्ही तयार आहात का?’ मीही खूप आत्मविश्वासाने म्हणाले, ‘हो, नक्कीच! कधीही सांगा, मी तयार आहे. त्यानंतर त्यांनी मला दुसऱ्या दिवशी आरामनगरला येण्यास सांगितलं. तिथे एका मोठ्या व्यक्तीचा बंगला होता. त्यांनी मला साडी नेसून यायला सांगितलं. मीही साडी नेसून तिथे गेले. तिथे पोहोचल्यावर माझ्यासोबत दोन बाऊन्सर्स होते. ते पाहून मला वाटलं, ‘अरे देवा! मी इतकी मोठी झाले की, माझ्यासोबत दोन बाऊन्सर्स आहेत! मी तिथे सोफ्यावर बसले होते.’
‘तेवढ्यात समोरून एक अभिनेत्री आली. तिचं नाव किंवा ओळख मी सांगू शकत नाही. तिला पाहताच माझ्या डोक्यात विचारांचं चक्र सुरू झालं. सुषमा, इथे काहीतरी चुकीचं घडतंय. तू काहीतरी वेगळाच अर्थ घेतलास. कॉम्प्रोमाइजचा अर्थ तू समजलीस तो नाही, तर काहीतरी वेगळाच आहे, असं मला वाटू लागलं. तिथे असलेल्या कास्टिंग डायरेक्टरला मी विचारलं, ‘मी इथे का बसले आहे?’ त्यावर तो म्हणाला, ‘प्रोड्युसर वर बसले आहेत. तुम्हाला त्यांच्या रूममध्ये जायचं आहे.’ त्याच क्षणी माझ्या मनात सुरू असलेली सगळी गणितं जुळली. मला खूप भीती वाटू लागली. आयुष्यात कदाचित पुन्हा कधी घर पाहायला मिळणार नाही, असं वाईट विचारही माझ्या मनात येऊ लागले. तिथे गोलाकार जिना होता. कास्टिंग डायरेक्टर पुढे, मी त्याच्या मागे आणि माझ्या मागे दोन बाऊन्सर्स होते. वर जाण्याशिवाय किंवा खाली उतरण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नव्हता. तिथून पळून जाणंही शक्य नव्हतं. अखेर दरवाजा उघडला आणि समोर प्रोड्युसर बसले होते. त्यांच्या अंगावर कपडेही नव्हते.’
‘मला नेमकं काय करावं हेच सुचत नव्हतं. मी साडी सावरत होते. तेव्हा मला साडी नेसून चालण्याचीही सवय नव्हती. मी साडी थोडी वर घेतली आणि त्या दोन्ही बाऊन्सर्सना म्हणाले, ‘मला पेप्सी, कोका कोला पाहिजे.’ असं म्हणत मी त्यांना धक्का दिला आणि तिथून पळ काढला. मी पळतच बाहेर आले आणि आरामनगरमधील एका चाळीत जाऊन उभी राहिले. तिथे पोहोचल्यावर आता आपण सुरक्षित आहोत, असं मला वाटलं. त्यानंतर त्या माणसानं मला फोन करायला सुरुवात केली. ‘तुम्ही पुन्हा या,’ असं तो म्हणत होता. पण मी त्याला स्पष्ट सांगितलं की, मला पुन्हा यायचं नाही. तो माझ्या मागेही आला. त्यानं मला सांगितलं की, ‘तुम्ही आमच्याकडे काम केलं तर आयुष्यभर तुमची एटीएम मशीन होऊ शकते. तुम्हाला आयुष्यात काम करण्याची गरजच पडणार नाही.’ त्यावेळी मला खूप घाणेरडं वाटलं. माझी भावना मी शब्दांत सांगू शकत नाही. भीतीने माझं हृदय आताच तोंडातून बाहेर येईल, असं वाटत होतं. मी रडू लागले. त्यानंतर रिक्षा केली. रिक्षावाल्यानेही, ‘तुम्ही याआधीही यांच्याकडे येऊन गेला असाल ना?’ अशा अतिशय घाणेरड्या भाषेत मला प्रश्न विचारला. ते ऐकून मी आणखी रडू लागले. मला आता चित्रपटसृष्टीत कामच करायचं नाही, असं वाटू लागलं.’ असं सुषमा शेवटी म्हणाली. Oovaation talks ला दिलेल्या मुलाखतीत सुषमा जयवंत बोलत होती.