
प्रसिद्ध गायक झुबीन गर्गच्या मृत्यूप्रकरणातील तपासाला एक नवीन वळण मिळालं आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवारी सांगितलं की, दिल्लीतील सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या (CFSL) व्हिसेरा अहवालामुळे तपासाला स्पष्ट दिशा मिळाली आहे. 19 सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये झुबीनचा समुद्रात पोहताना संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. या घटनेनंतर आसाम पोलिसांच्या सीआयडीने हत्या, गुन्हेगारी कट आणि निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवून आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. झुबीनच्या मृत्यूप्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री सरमा यांनी फेसबुक लाइव्हद्वारे सांगितलं, “व्हिसेरा नमुन्यांच्या अहवालामुळे तपासाला एक नवीन दिशा मिळाली आहे आणि येत्या काही दिवसांत या प्रकरणाशी संबंधित संपूर्ण घटनाक्रम न्यायालयात सादर केला जाईल. सध्या अपेक्षेनुसार दिशेने तपास जात आहे. सीएफएसएलने शुक्रवारी व्हिसेरा अहवाल जाहीर केला. आधी आसाम पोलिसांकडे तो अहवाल सोपवण्यात आला. त्यानंतर पुढे ते गुवाहाटी मेडिकल कॉलेजला पाठवण्यात आलं. जेणेकरून तिथलं वैद्यकीय पथक संपूर्ण पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार करू शकेल.”
सिंगापूरमध्ये मृत्यू झाल्यानंतर तिथल्या रुग्णालयात आधी झुबीनच्या पार्थिवाचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्यात झुबीनचा मृत्यू पाण्यात बुडाल्याने झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. परंतु या रिपोर्टवर समाधानी नसल्याने गुवाहाटीला आणल्यानंतर पुन्हा एकदा गुवाहाटी मेडिकल कॉलेजमधील तज्ज्ञांच्या पथकाद्वारे पोस्टमॉर्टम करण्यात आला. सीएफएसएलच्या अहवालातून आता तपासात नवीन गोष्टी उघड होण्याची अपेक्षा आहे.
झुबीनच्या मृत्यूप्रकरणी नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलचे आयोजक श्यामकानू महंता, झुबीनचा मॅनेजर सिद्धार्थ शर्मा, बँडमधील सदस्य शेखर ज्योती गोस्वामी, गायिका अमृतप्रभा महंता, झुबीनचा चुलत भाऊ संदीपन गर्ग यांना अटक करण्यात आली आहे. त्याचसोबत झुबीनचे दोन वैयक्तिक सुरक्षा रक्षक परेश बैश्य आणि नंदेश्वर बोराह यांनासुद्धा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्यावर झुबीनच्या निधीचा गैरवापर केल्याच आरोप आहे. तर सीआयडी श्यामकानू महंता यांच्याविरुद्ध आर्थिक अनियमिततेची चौकशी करत आहे.
यॉटवर झुबीनसोबत उपस्थित असलेल्या 11 जणांपैकी आठ जणांना सीआयडीने समन्स बजावले होते. याआधी झुबीनचा बँड मेंबर शेखरज्योती गोस्वामी याने त्याचा मॅनेजर सिद्धार्थ शर्मा आणि श्यामकानू महंता यांच्यावर गंभीर आरोप केला होता. या दोघांनी झुबीनला विष दिल्याचा धक्कादायक आरोप त्याने केला होता. इतकंच नव्हे तर समुद्रात जेव्हा झुबीन श्वास घेण्यासाठी तडफडत होता, तेव्हा मॅनेजर सिद्धार्थ शर्मा हा ‘जाबो दे, जाबो दे’ (जाऊ दे, जाऊ दे) असं ओरडत असल्याचंही त्याने सांगितलं आहे.