मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी खायला द्या ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या फायदे

| Updated on: Jul 14, 2022 | 6:35 PM

चौरस आहारात प्रथिने, व्हिटॅमिन आणि ॲंटीऑक्सिडेंटचा समावेश असतो. ज्यामुळे मेंदूचे पोषण होते व त्याचे ताण-तणावापासून संरक्षण होते. त्या आहारासाठी काय काय खाणे गरजेचे आहे ते पाहुया.

मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी खायला द्या हे पदार्थ, जाणून घ्या फायदे
बौद्धिक वाढीसाठी खायला द्या 'हे' पदार्थ
Image Credit source: Google
Follow us on

असं म्हटलं जातं की, लहान मुलं म्हणजे मातीच्या गोळ्यासारखी असतात. आपण त्यांना जसा आकार देऊ, जे शिकवू, त्या गोष्टी ते आत्मसात करतात. त्यामुळे लहानमुलांच्या जडणघडणीसाठी, मानसिक, बौद्धिक वाढीसाठी (Mental Growth) त्यांना चांगल्या सवयी लावणे अत्यंत गरजेचे आहे. वागण्या-बोलण्याप्रमाणेच खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयींमुळे त्यांचा शारीरिक विकास चांगला होतो. तसेच चौरस आहारामुळे त्यांचा बौद्धिक विकासही सकारात्मक होतो आणि शिकणे, लक्षात ठेवणे, एकाग्रता (Concentration)आणि चांगली वागणूक वाढण्यास, विकासास प्रोत्साहन मिळते. चौरस आहारात प्रथिने, व्हिटॅमिन आणि ॲंटीऑक्सिडेंटचा समावेश असतो. ज्यामुळे मेंदूचे पोषण होते व त्याचे ताण-तणावापासून संरक्षण होते. मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी काही पदार्थ (kids diet)अतिशय महत्वाचे असतात, ते कोणते हे जाणून घेऊया.

अंडी

संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे… असं म्हटलं जातं, ते उगाच नाही. अंड्यामध्ये भरपूर पोषक तत्वे आणि प्रोटीन्स असतात, ज्यामुळे मुलांची एकाग्रता वाढते. अंड्यांमुळे मुलांच्या मेंदूच्या कार्यक्षमतेतही वाढ होते. ‘सेरोटोनिन’ हे आनंदाची भावना निर्माण करणारे हार्मोन्स निर्माण करण्यात अंडी मदत करतात. ज्यामुळे मुलं संपूर्ण दिवस आनंदी, खुश राहतात. पोषक गुणधर्मांचा खजिना असणाऱ्या ह्या अंड्याचा रोजच्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे.

मासे

माशांमध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा -3 फॅटी ॲसिड्स, आयोडीन आणि झिंक (जस्त) असते, जे मेंदूच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका निभावतात. मासे खाल्ल्याने शरीराला आवश्यक ते घटक भरपूर प्रमाणात मिळतात. मासे खाल्ल्यामुळे वाढत्या वयामुळे मेंदूचे कार्य बिघडण्यापासून संरक्षण मिळते. तसेच मूड नियंत्रित होतो आणि स्मरणशक्तीही वाढते. जी मुलं दर आठवड्याला मासे खातात, ते उदास होण्याची शक्यता कमी असते, कारण माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात असतात.

हे सुद्धा वाचा

जांभूळ

जांभूळ हे अतिशय चविष्ट फळ आहे. त्यामधील एंथोसायनिन नावाचा घटक मेंदूसाठी अतिशय उपयुक्त असतो. जांभूळ खाल्ल्यामुळे मेंदूतील रक्त प्रवाह सुधारतो, तसेच सूजही येत नाही. मधुमेह, हृदयविकार, त्वचा विकार तसेच पोटाच्या विकारांवर जांभूळ गुणकारी असते. लहान मुलांच्या बौद्धिक व मानसिक विकासासाठी जांभूळ अतिशय फायदेशीर ठरते.

दही

दूध, दही, ताक हे पदार्थ सर्वांच्याच आरोग्यासाठी उपयुक्त असतात. मात्र प्रोटीनने भरपूर असे गोड दही मेंदूसाठी अतिशय चांगले असते. दह्यामधील आयोडिनमुळे मेंदूची कार्यक्षमता सुधारते. दह्यात प्रोटीन, झिंक (जस्त), बी 12 आणि सेलेनियम मोठ्या प्रमाणात असते. हे सर्व घटक मेंदूच्या विकासासाठी महत्वपूर्ण असतात. त्यामुळे मुलांच्या रोजच्या आहारात दह्याचा समावेश नक्की करा.

संत्रे

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते, जे मेंदूसाठी उपयुक्त ठरते. मुलांच्या आहारात संत्र्याचा समावेश केल्यामुळे त्यांच्या कामगिरीत सुधारणा होते. तसेच एकाग्रता, स्मरणशक्तीवर यावरही सकारात्मक परिणाम होतो. त्यांच्या निर्णय क्षमतेतही सुधारणा होते. संत्रे हे मानसिक व शारीरिक विकासासाठी अतिशय उपयोगी ठरते. (Add these super food items in your kids diet for better mental growth)