महाराष्ट्र किंवा देशात लॉकडाऊन लागू शकतो का?; डॉ. अविनाश भोंडवे नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Dec 22, 2022 | 1:37 PM

मृत्यूची संख्या वाढली, खूप लोक बाधित झाले, रुग्णालय भरू लागले तरच लॉकडाऊन लावला जाऊ शकतो. पण आताची जी परिस्थिती आहे त्यानुसार आजार वाढतो.

महाराष्ट्र किंवा देशात लॉकडाऊन लागू शकतो का?; डॉ. अविनाश भोंडवे नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्र किंवा देशात लॉकडाऊन लागू शकतो का?; डॉ. अविनाश भोंडवे नेमकं काय म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे: चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हायरसने हाहाकार उडवला आहे. कोरोनामुळे चीनमध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. हजारो लोकांना कोरोनाची लागण झाल्याने रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी खाटाच शिल्लक राहिलेल्या नाहीयेत. रुग्णांवर जमिनीवरच उपचार केले जात असून मृतदेहही जमिनीवरच ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे चीनमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोनाचा हा व्हायरस चीनमधून थेट अमेरिका आणि जपानसह अनेक देशात पोहोचला असून त्यामुळे तिथेही हाहाकार उडाला आहे. भारतानेही या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेतली असून कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.

ओमिक्रॉनचा हा सब व्हेरिएंट आहे. हा व्हेरिएंट सौम्य समजला जात होता. पण त्याचा संसर्ग वेगाने होतो. हा मूळच्या कोरोनापेक्षा 18 पट वेगाने पसरतो. त्यामुळे तो अनेकांना वेगाने होतो. त्याची मारक शक्ती जास्त नाहीये. आता गेल्या काही दिवसात चीनमधून जे व्हिडीओ आलेत त्यामुळे चिंतेचं वातावरण पसरलं आहे, असं आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

भारतात हा आजार आला आहे. भारतात 130 ते 135 पेशंट सापडल्याची बातमी आहे. सर्दी, ताप, खोकला ही या आजाराची लक्षणे आहेत. पण तीन ते पाच दिवसात हा आजार पूर्ण बरा होतो. ज्यांनी आधी लस घेतली असली तरी त्यांना हा आजार होतो. लस घेतली नसलेल्यांचा त्रास वाढू शकतो. लस घेतली असेल तर गंभीर आजार होत नाही, असं भोंडवे यांनी सांगितलं.

70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना या व्हायरसची लागण पटकन होते. तसेच ज्यांना मधूमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार आहे त्यांनाही या आजाराचा अधिक त्रास होतो. आपल्याकडे पूर्ण लसीकरण झालं नाही. काहींचे दोनच डोस झाले आहेत. काहींचे तेही झाले नाही.

तर काहींचा तिसरा डोस झाला नाही. लसीकरणालाही वर्ष झालं आहे. त्यामुळे नव्याने चौथा डोस दिला पाहिजे. हा विषाणू या पुढेही येणार आहे. त्यापासून संरक्षण मिळेल याची खबरदारी सरकारने घेतली पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

या आजारापासून बचाव करायचा असेल तर आधीचेच प्रतिबंधक उपाय केले पाहिजेत. प्रतिबंधक उपाय म्हणजे गर्दी टाळा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क लावा, हात स्वच्छ धुवा. पण लॉकडाऊन सारखा कठोर उपाय वापरला जाऊ शकणार नाही.

लॉकडाऊन लागल्याने लोकांनी चीनमध्ये निदर्शने केली. त्यामुळे आपल्याकडे ही वेळ येऊ नये म्हणून लोकांनी प्रतिबंधक उपाय वापरले पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.

मृत्यूची संख्या वाढली, खूप लोक बाधित झाले, रुग्णालय भरू लागले तरच लॉकडाऊन लावला जाऊ शकतो. पण आताची जी परिस्थिती आहे त्यानुसार आजार वाढतो. मोठ्या प्रमाणात वाढला तरी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्याची वेळ येत नाही.

लोक होम आयसोलेशनमध्ये बरे होऊ शकतात. लोकांनी घाबरू नये. फार विशेष औषध लागत नाही. पण चीनच्या बातम्यांवर सरकारने बोललं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.