बदलत्या जीवनशैलीमध्ये हृदय सुदृढ ठेवण्यासाठी करा ‘या’ सवयींचं पालन
आजकाल हृदयविकार झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी काही चांगल्या दैनंदिन सवयी अंगीकारणे महत्त्वाचे आहे. चला याबद्दल आजच्या लेखात जाणून घेऊयात.

रोजच्या धावपळीच्या जीवनात वाढता ताण-तणाव यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. एवढेच नाहीतर आजकाल हृदयविकाराच्या समस्याही वाढत आहेत. त्यामुळे आजच्या या काळात आपले हृदय निरोगी ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. कारण हृदय हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. ते संपूर्ण शरीरात रक्त आणि ऑक्सिजन पंप करते, ज्यामुळे सर्व अवयवांचे कार्य सुरळीत चालते. आजकाल हृदयाशी संबंधित समस्या झपाट्याने वाढत आहेत. अनेक लोकं समस्या सुरू झाल्यावरच आपल्या हृदयाच्या आरोग्याकडे लक्ष देतात. हृदयाची लवकर काळजी घेतल्यास भविष्यातील अनेक गुंतागुंतीचा धोका कमी होऊ शकतो.
दीर्घकाळ हृदय निरोगी ठेवण्यासाठी काही चांगल्या दैनंदिन सवयी अंगीकारणे महत्त्वाचे आहे. लहान सकारात्मक सवयी सुद्धा भविष्यात हृदयविकाराचा झटका, हृदय निकामी होणे, कोरोनरी आर्टरी डिसीज आणि स्ट्रोक यांसारख्या गंभीर समस्यांचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात. तर कोणत्या सवयी अंगीकाराव्यात, कोणत्या टाळाव्यात आणि कोणती लक्षणे टाळावीत हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी या सवयी अंगीकारल्या पाहिजेत
नॅशनल हार्ट, लंग अँड ब्लड इन्स्टिट्यूट (NHLBI) नुसार , निरोगी हृदय राखण्यासाठी संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैली आवश्यक आहे. आपल्या आहारात फळे, हिरव्या भाज्या, संपूर्ण धान्य, कडधान्ये, शेंगा, सुकामेवा, बिया, कमी फॅटचे दूध आणि मासे यांचा समावेश करा. या पदार्थांमध्ये फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि आरोग्यदायी फॅट असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात.
याव्यतिरिक्त, दररोज शारीरिक हालचाल करा, पुरेशी झोप घ्या आणि निरोगी वजन राखण्याचा प्रयत्न करा.
जर तुम्हाला उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल किंवा मधुमेह असेल, तर ते नियंत्रणात ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. नियमित आरोग्य तपासणी करणे देखील फायदेशीर ठरू शकते. या छोट्या सवयी दीर्घकाळात हृदय निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या सवयी टाळल्या पाहिजेत?
हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी धूम्रपान आणि तंबाखूपासून दूर राहा. अतिरिक्त मीठ, साखर, तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थांचे सेवन टाळा. बराच वेळ एकाच जागी बसून राहणे हे देखील हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते.
तुम्ही जर मद्यपान करत असाल, तर त्याचे सेवन मर्यादित करा किंवा ते टाळा. याव्यतिरिक्त दीर्घकाळचा ताण आणि झोपेची कमतरता यांचाही तुमच्या हृदयावर परिणाम होऊ शकतो. निरोगी हृदयासाठी निरोगी जीवनशैली राखणे आणि आपल्या दैनंदिन सवयींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये?
जर तुम्हाला छातीत दुखणे, दाब किंवा जडपणा जाणवत असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल, जास्त थकवणारे काम न करताही लवकर थकवा येत असेल, चक्कर येत असेल, हृदयाचे ठोके खूप जलद किंवा अनियमित वाटत असतील किंवा पायांना सूज आलेली दिसत असेल, तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.
ही हृदयाच्या समस्येची लक्षणे असू शकतात. जर तुम्हाला ही लक्षणे दिसली, तर विनाविलंब डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळेवर निदान आणि उपचारांमुळे गंभीर गुंतागुंतीचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)