
मार्केटमध्ये अनेक हिरव्या पाले भाज्या पाहायला मिळतात. हिरव्या भाज्या तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. त्यापैकी एक म्हणजे कोथिंबीर. कोथिंबीर फक्त कोणत्याही पदार्थाची चव वाढवत नाही तर तुमच्या आरोग्यासाठी देखील त्याचा खूप फायदा होतो. कोथिंबीरमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात ज्यांच्या सेवनामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. कोथिंबीरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात ज्यामुळे तुमचं शरीर निरोगी राहाण्यास मदत होते. कोथिंबीरीचा वापर अनेक पदार्थांमध्ये सजावटीसाठी देखील केला जातो. अनेकांना जेवणाच्या ताटामध्ये कोथिंबीरची चटणी खायला आवडते.
कोथिंबीरीमधील फायटोन्यूट्रिएंट्स, फायबर, मँगनीज, लोह आणि मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि प्रथिने आढळतात ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा संसर्गाचा आजार होत नाही आणि तुमच्या शरीरातील उर्जा टिकून राहाते. कोथिंबीरमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, थायामिन आणि कॅरोटीन यांच्या सारखे घटक आढळतात ज्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. तज्ञांच्या मते, रात्री झोपण्यापूर्वी कोथिंबीरीचे पाणी प्यायल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. चला तर जाणून घेऊया रात्री झोपण्यापूर्वी कोथिंबीरीच्या पाण्याचे फायदे.
रात्री झोपण्यापूर्वी कोथिंबीरीचे पाणी प्यायल्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते त्यासोबतच पोटासंबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. कोथिंबीरीचे पाणी तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर कोढून शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करतात. तुम्हाला जर जेवल्या नंतर पोट फुगण्याच्या समस्या असतील तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी कोथिंबीरीच्या पाण्याचे सेवन करू शकता. कोथिंबीरीमध्ये फायबर असते ज्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठता सारख्या समस्या होत नाही आणि पोटाचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. कोथिंबीरीचे पाणी तुमच्या शरीरला नैसर्गिक रित्या डिटॉक्स करते आणि तुमच्या किडणीचे आरोग्य देखील निरोगी ठेवण्यास मदत करते. कोथिंबीरीचे पाणी नियमित प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तवाहिन्या सुरळीत होतात आणि रक्त शुद्ध होण्यास मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोथिंबीरीच्या पाण्याचे सेवन अत्यंत फायदेशीर असते. कोथिंबीरीचे पाणी तुमच्या शरीरातील साखर नियंत्रित ठेवते ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो. कोथिंबीर शरीरातील इन्सुलिनचे कार्य सुधारते.
वजन कमी करण्यासाठी देखील कोथिंबीरीचे पाणी फायदेशीर ठरेल. कोथिंबीरीच्या पाण्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते ज्यामुळे तुमच्या शरीराला योग्य पोषण मिळते. कोथिंबीरीचे पाणी तुमच्या शरीरातील चयापचय वाढवण्यास आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते. कोथिंबीरीचे पाणी बवनण्यासाठी तुम्ही कोथिंबीर स्वच्छ धुवा आणि मिक्सरमध्ये वाटून घ्या त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी मिसळून पुन्हा एकदा ग्राईंड करा. त्यामध्ये एक आल्याचा तुकडा टाकल्यामुळे तुमच्या शरीराला आणि पोटाला फायदा होतो. आल्यामुळे बद्धकोष्ठा आणि पोटदुखीच्या समस्या दूर होण्यास मदत होते आणि शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते.