फक्त पिण्यासाठी नाही, चेहऱ्याचा ग्लो वाढवण्यासाठीही उपयोगी आहे ग्रीन टी, असा करा वापर
ग्रीन टी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते, पण स्किन केअरमध्ये सुद्धा तिचा वापर करता येतो. चेहऱ्याचा ग्लो आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने ग्रीन टी कसे वापरावे हे पाहा.

प्रदूषण, धूळ-माती, जंक फूड आणि त्वचेची योग्य काळजी न घेण्याच्या सवयींचा परिणाम हळूहळू चेहऱ्यावर दिसू लागतो. त्यामुळे पिंपल्स, डलनेस, आणि अकाली वृद्धत्वासारख्या समस्या वाढू शकतात. अशावेळी स्किन केअरसाठी नैसर्गिक घटकांचा वापर करण्याकडे अनेकांचा कल असतो. ग्रीन टी हा केवळ आरोग्यासाठी प्यायचा पेय प्रकार नसून, त्याचा स्किन केअरसाठी देखील वापर करता येतो. अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी युक्त ग्रीन टी वेगवेगळ्या प्रकारे त्वचेवर वापरता येते. चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी ग्रीन टीचा नेमका कसा वापर करायचा, जाणून घेऊया.
ग्रीन टी बाथ सोक
यासाठी २ ते ३ कप ग्रीन टी तयार करून ती पूर्णपणे थंड होऊ द्या. त्यानंतर ही ग्रीन टी कोमट पाण्याने भरलेल्या बाथटबमध्ये टाकावी. या पाण्यात साधारण १० ते १५ मिनिटे बसता येते. त्वचेला चिकटपणा किंवा जळजळ जाणवत असल्यास त्यानंतर साध्या पाण्याने शॉवर घ्यावा.
ग्रीन टी बॉडी मिस्ट
ग्रीन टीचा बॉडी मिस्ट म्हणूनही वापर करता येतो. यासाठी हलकी ग्रीन टी तयार करून ती पूर्णपणे थंड करावी. त्यानंतर स्वच्छ स्प्रे बॉटलमध्ये भरून आंघोळीनंतर शरीरावर स्प्रे करता येते. हा स्प्रे फ्रिजमध्ये ठेवावा आणि २ ते ३ दिवसांनी फेकून द्यावे. याचा वापर चेहऱ्यावरही करता येतो.
ग्रीन टी फेशियल स्टीम
ग्रीन टी तयार करून ती कोमट पाण्यात मिक्स करा. त्यानंतर स्वच्छ टॉवेल या पाण्यात भिजवून पिळून घ्यावा आणि काही मिनिटांसाठी चेहऱ्यावर ठेवावा. या पद्धतीमुळे त्वचेला आराम मिळू शकतो.
ग्रीन टी आणि तांदळाच्या पाण्याने करा वॉश
साधे तांदळाचे पाणी तयार करून ते थंड करावे. त्यानंतर थंड केलेल्या ग्रीन टीमध्ये थोडे तांदळाचे पाणी मिक्स करा. हे मिश्रण स्वच्छ त्वचेवर साधारण ५ ते १० मिनिटे लावून नंतर धुवा. या मिश्रणात अनेक गोष्टी एकत्र करण्याऐवजी ते साधे ठेवा.
डोळ्यांच्या जवळपासच्या भागासाठी ग्रीन टी
तयार केलेली ग्रीन टी फ्रिजमध्ये ठेवून थंड करावी. त्यानंतर दोन स्वच्छ कॉटन पॅड त्यात भिजवून बंद डोळ्यांवर ५ ते ७ मिनिटे ठेवता येतात. यामुळे डोळ्यांच्या जवळपासच्या भागाला फ्रेशनेस जाणवू शकतो. मात्र, यामुळे डार्क सर्कल कायमचे दूर होणार नाही.
ग्रीन टी आइस क्यूब्स
ग्रीन टी तयार करून ती थंड करावी आणि आइस-क्यूब ट्रेमध्ये गोठवावी. त्यानंतर एक बर्फाचा क्यूब स्वच्छ, मऊ कपड्यात गुंडाळून काही वेळ हळूवारपणे चेहऱ्यावर फिरवता येतो. बर्फ थेट त्वचेवर ठेवू नये, कारण त्यामुळे जळजळ किंवा आइस बर्न होऊ शकतो.
(डिस्क्लेमरः या लेखातील महिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा कुठलाही दावा करत नाही. दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)
