Arthritis Prevention Tips: आहात संधीवाताने त्रस्त? ‘हे’ 6 उपाय ठरतील उपयुक्त !

| Updated on: Nov 23, 2022 | 12:50 PM

संधीवाताचा त्रास टाळायचा असेल तर सुरूवातीपासूनच आपल्या आरोग्याकडे योग्य लक्ष देणे गरजेचे आहे. काही उपायांनी संधिवातापासून बचाव करता येऊ शकतो.

Arthritis Prevention Tips: आहात संधीवाताने त्रस्त? हे 6 उपाय ठरतील उपयुक्त !
Follow us on

नवी दिल्ली – हृदयरोग, मधुमेह, हाय ब्लड प्रेशन याप्रमाणेच आर्थ्रायटिस (Arthritis) म्हणजेच संधिवातामुळेही एखाद्या व्यक्तीला खूप त्रास सहन करावा लागू शकतो. संधिवातामध्ये एक किंवा अधिक साध्यांमध्ये तीव्र वेदना होणे, सूज येणे, सांधे आखडणे तसेच कोणतेही काम करताना वेदना (pain in joints) होणे, असा त्रास होऊ शकतो. या आजारामुळे गुडघे, पार्श्वभाग, पाठीचा कणा आणि हात यांच्यावर परिणाम होऊ शकतो. एकदा सांध्यामधील कार्टिलेज खराब झाले तर ते बरे होऊ शकत नाही. त्यामुळे सुरूवातीपासूनच आपल्या आरोग्याची योग्य काळजी (tips for prevention) घेणे गरजेचे आहे. ज्यामुळे भविष्यात सांधेदुखीचा धोका कमी होईल.

संधीवाताच त्रास टाळण्यासाठी काय उपाय करावेत हे जाणून घेऊया.

हे सुद्धा वाचा

1) वजन योग्य प्रमाणात ठेवावे

शरीराचे वजन प्रमाणापेक्षा जास्त असेल तर त्याचा थेट परिणाम सांध्यावर होतो. विशेषत: गुडघे, कंबर आणि हिप्सची हाडे (पार्श्वबाग) यांना आपल्या वजनाचा भार उचलावा लागतो. याव्यतिरिक्त शरीरातील अतिरिक्त चरबीमुळेही सांध्याचे नुकसान होते. त्यामुळे संधिवाताचा त्रास टाळायचा असेल तर आपले वजन प्रमाणात ठेवा. वजन वाढले असेल तर ते प्रययत्नपूर्वक कमी करावे.

2) धूम्रपान करू नये

धूम्रपान हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक असते. धूम्रपान केल्याने सांध्यामधील कार्टिलेज खराब होण्याचा धोका वाढतो, तसेच संधिवाताचा त्रास आणखी वाढू शकतो. धूम्रपान केल्याने संधिवाताच्या उपचारांवर देखील परिणाम होतो, तसेच शस्त्रक्रियेदरम्यान गुंतागुंत होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे धूम्रपान बंद केल्यास संधिवात रोखू शकतो.

3) गरजेपेक्षा अधिक व्यायाम घातक

आपले सांधे आणि लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करणे गरजेचे आहे. हे सांध्यामधील कर्टिलेज सुरक्षित राहण्यास देखील मदत करते. प्रत्येक व्यक्तीने आठवड्यातून 3 ते 4 वेळा अर्धा तास तरी व्यायाम केला पाहिजे. तुम्ही पोहणे, सायकलिंग किंवा फक्त चालण्याचा व्यायाम करू शकता. धावणे हाही एक चांगला व्यायाम ठरतो. पण आधीच सांधेदुखीचा त्रास होत असेल तर धावणे टाळावे. तसेच अति व्यायामही करू नये अन्यथा तो घातक ठरू शकतो.

4) बसण्याची पद्धत सुधारा

जर तुमच्या बसण्याची पद्धत चुकीची असेल किंवा तुम्ही बराच काळ बसून काम करत असाल आणि पोश्चरकडे लक्ष देत नसाल तर त्याचा परिणामही तुमच्या सांध्यावर होऊ शकतो. तुम्ही उभे राहिला असाल, बसला असाल किंवा चालत असाल पण तुमचे पोश्चर नीट असले पाहिजे. तरच सांधेदुखीपासून तुमचा बचाव होऊ शकतो.

5) हाय हिल्सचा वापर टाळा

उंच टाचांच्या म्हणजेच हाय हिल्सच्या चपला घालून चालल्यामुळे तुमचे पाय, हिप्स आणि मणक्याच्या सांध्यावर ताण पडतो. तुम्ही बराच काळ हाय हिल्स वापरत असा तर त्यामुळेही सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. सांध्यांचे नुकसान टाळायचे असेल तर पायाला आराम मिळेल अशा चपला घालाव्यात.

6) संतुलित आहार घ्यावा

योग्य प्रमाणात वजन हवे असेल तर त्यासाठी कॅलरीवर नियंत्रण ठेवणे देखील महत्वाचे आहे. संधिवात टाळायचा असेल तर आपल्या आहारात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचा समावेश करा. आलं, लसूण, मासे, शेंगदाणे, बेरी, प्रत्येक रंगाची फळे आणि हिरव्या पालेभाज्या यांचे सेवन करावे. याशिवाय जास्त प्रमाणात मीठ, साखर, प्रक्रिया केलेले आणि रिफाइन्ड पदार्थ, तसेच सॅच्युरेटेड फॅट्स खाऊ नका. या पदार्थांमुळे जळजळ वाढते. तसेच, रक्तातील साखरेच्या पातळीवर लक्ष ठेवून ती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करावा, कारण मधुमेहामुळे ऑस्टियोआर्थ्रायटीसचा धोका देखील वाढतो.

(टीप- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)